दोन दरवाजे चार इंचाने उघडले
वार्ताहर / तुडये
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाने आपली पूर्ण क्षमतेने भरण्याची पातळी पूर्ण केली आहे. शनिवारी सकाळी पाणीपातळीची 2475.30 फूट अशी नोंद झाली आहे. पाण्याचा वाढता ओघ पाहून जलाशयाकडील वेस्ट वेअरच्या सहा दरवाजांपैकी दोन दरवाजे चार इंचाने उघण्यात आले आहेत. परिणामी मार्कंडेय नदीला पुन्हा पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी सकाळी 56.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यावर्षाचा एकूण पाऊस 1954.1 मि.मी. झाला आहे.
यावर्षी 15 मे पासूनच पावसाने जोर दिल्याने जलाशयाची पाणीपातळी झपाट्याने वाढली. 2 जुलै रोजी जलाशयाची पाणीपातळी 2473 फूट झाल्यानंतर पुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी जलाशयाचे दोन दरवाजे सात इंचापर्यंत उघडण्यात आले होते. ते दोन दिवसापूर्वीच बंद करण्यात आले होते.
जून महिन्यात जलाशय पाणलोट क्षेत्रात 935 मि.मी. पाऊस झाला होता. त्या पाठोपाठ जुलै महिन्यातही 921.8 मि.मी. पाऊस शनिवारपर्यंत झाला आहे. या दोन महिन्यात एकूण 1954.1 मि.मी. पावसापैकी 1856.8 मि.मी. पाऊस झाला आहे. मागील वर्षी पाणीपातळी ही आजच्या पाणीपातळीपेक्षा एक फुटाने जादा म्हणजे 2476.30 फूट होती. जलाशय तुडुंब झाल्याने बेळगाव शहरासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
पाण्याचा विसर्ग
पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी वेस्टेवेअरच्या सहा दरवाजांपैकी दोन दरवाजे हे चार इंचाने उघडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग मार्कंडेय नदीत सुरू आहे. 2 जुलैपासून 23 जुलैपर्यंत दोन दरवाजे हे सलग उघडण्यात आले होते. ते बंद केल्यानंतर शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसामुळे शनिवारी सकाळी दोन दरवाजे चार इंचाने पुन्हा उघडण्यात आले. शनिवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने जलाशयात येणाऱ्या पाण्याचा ओघ वाढला आहे. जलाशयाच्या काठावरील शेतात पाणी शिरल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत.









