2447 फुटापर्यंत खालची पातळी नोंदवली
वार्ताहर /तुडये
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय परिसरात बुधवारी दुपारनंतर तुरळक प्रमाणात पावसाने सुरुवात केली आहे. सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने मार्कंडेय नदी आणि जलाशयाला मिळणाऱ्या नाल्यातून पाणी वाहण्यास सुरुवात झाल्यास पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जुलै महिना उजाडला तरीही पावसाने दडी मारल्याने पाणीपातळीने 2447 फुटापर्यंत खालची पातळी नोंदवली आहे. पावसाने 1 जुलैपासून सुरुवात केली असली तरीही पाणीपातळी मात्र वाढलेली नाही. बुधवारी सकाळी जलाशयाची पाणीपातळी 2447.20 फूट इतकी होती तर 5.8 मि.मी. इतक्या तुरळक प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी एकूण 301.3 मि.मी. पाऊस झाला आहे. मागीलवर्षी जलाशयाची पाणीपातळी 2452.80 फूट तर एकूण पाऊस 468 मि.मी. झाला होता. अजूनही पावसाला जोर दिसत नसल्याने पाणीपातळी वाढण्याची शक्यता कमी झाली आहे. शहराला पाणीपुरवठा हा सध्या एका 50 हॉर्स पावरच्या वीजपंपाचा वापर करत पाणी उपसा करण्यात येत आहे. जलाशयाने स्थापनेपासून जुलै महिन्यातील निचांकी पातळी यावर्षी नोंदवली आहे. पावसाच्या हजेरीमुळे जलाशय काठावरील गाळामुळे जलाशयकाठ चिखलमय झाला आहे. या चिखलमय गाळामुळे जलाशयाकडे जाणे धोक्याचे बनले आहे.









