पाणीपातळीत कमालीची वाढ : दोन-तीन दिवसांत 2475 फुटाची पातळी पूर्ण होणार
वार्ताहर /तुडये
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय पाणलोट क्षेत्रात सलग सातव्या दिवशीही दमदार पावसाचा जोर कायम राहिल्याने पाणीपातळीत कमालीची वाढ होत आहे. येत्या दोन-तीन दिवसांत जलाशय आपली 2475 फुटाची पाणीपातळी पूर्ण करणार आहे. जलाशय तुडुंब भरण्याकडे वाटचाल सुरू आहे. शहराला यावर्षी एप्रिल महिन्यापासून जुलै महिन्याच्या अर्ध्या महिन्यापर्यंत पाण्याची तीव्र टंचाईची समस्या जाणवली होती. 15-20 दिवसांतून एकदा पाणीपुरवठा शहर पाणीपुरवठा विभागाने केला होता. जलाशय तुडुंब भरण्याच्या वाटेवर असल्याने शहरवासियांची समस्या आता दूर झाली आहे.
शनिवारी सकाळच्या पाणीपातळीत 2465.70 फुटावरून रविवारी सकाळी 3.10 फुटाने वाढ होत पाणीपातळी 2468.80 फुटापर्यंत वाढली. 24 तासांत 80.3 मि. मी. पावसाची नोंद झाली. एकूण 990.9 मि. मी. पाऊस झाला आहे. 1 जुलै रोजीच्या डेडस्टॉकमधील 2447 फूट पाणीपातळीत रविवारी सायंकाळपर्यंत एकूण 23.80 फूट पाणी वाढ झाली आहे. रविवारी सायंकाळी जलाशयाची पाणीपातळी ही 2470.80 फूट झाल्याने आता केवळ 4 फूट पाण्याची आवश्यकता आहे. केवळ 7 दिवसांतच जलाशयाने पाणी पातळी भरण्याकडे वाटचाल केली आहे. रविवारी दुपारीच जुनी पाणी पातळी पूर्ण केली होती. या पातळीच्या वर फूटभर पाणी आले आहे. तुडये-राकसकोप दरम्यानच्या परशीवरील जुना मार्ग पाण्याखाली गेला आहे. 1984 पूर्वीचा हा रस्ता वेस्ट वेअरचे दरवाजे उभारल्यानंतर बंद पडला असून वेस्ट वेअरच्या सहा दरवाज्यांखालील बाजूने मार्कंडेय नदीवर पुलाची निर्मिती करत रस्ता करण्यात आला आहे.
जलाशयाला मिळणारे नदी-नाले दुथडी
बैलूर (ता. खानापूर) गावापासून उगमस्थळ असलेल्या मार्कंडेय नदीला गावच्या उत्तर बाजूचे पाणी मार्कंडेय नदीला तर दक्षिणेकडील बाजूचे पाणी हे मलप्रभा नदीला जाऊन मिळते. बेटगिरी (ता. खानापूर) व तुडये (ता. चंदगड) गावच्या हद्दीतून वाहणाऱ्या जांभूळ ओहळ नाल्याचे पाणी हे मार्कंडेय नदीपेक्षा जादा प्रमाणात या जलाशयाला येऊन मिळते. या व्यतिरिक्त बेळवट्टी, इनाम बडस हद्दीतील लहान नाल्यातील पाणी मिळते. तुडये गावतील निम्मे पाणी हे जलाशयाला मिळते तर निम्मे पाणी माहरओहळ नाल्यातून वेस्टवेअरच्या दरवाज्याच्या उत्तरेस मार्कंडेय नदीला मिळते. तुडये येथील पश्चिम बाजूच सर्व पाणी हे तिलारी धरणाला मिळते. सलगच्या पावसामुळे या जलाशयाला मिळणारे सर्व नाले व मुख्य नदी पात्र दुथडी भरून वाहू लागले आहे. या प्रचंड ओघाने जलाशयाला मिळणाऱ्या पाण्यामुळे चार फूट आवश्यक पाणी पातळी दोन-तीन दिवसातच पूर्ण होणार आहे. दि. 23 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजताची पाणीपातळी 2470.80 फूट इतकी झाली आहे. यामध्ये रात्रभरात आणखी फूट ते दीड फुटाने वाढ होणार आहे.
जलाशय पाणीपातळीत झालेली वाढ व पाऊस
- दिनांक झालेला पाऊस एकूण पाऊस पाणीपातळी गतवर्षाची पातळी
- 17/07/23 18.3 मि. मी. 534.3 मि. मी. 2452.10 फूट 2473.10 फूट
- 18/07/23 35.6 मि. मी. 569.9 मि. मी. 2453.5 फूट 2472.90 फूट
- 19/07/23 103.7 मि. मी. 673.6 मि. मी. 2455.80 फूट 2473.20 फूट
- 20/07/23 76 मि. मी. 749.6 मि. मी. 2458.90 फूट 2473.50 फूट
- 21/07/23 89.3 मि. मी. 838.9 मि. मी. 2462.40 फूट 2473.50 फूट
- 22/07/23 71.7 मि. मी. 910 मि. मी. 2465.70 फूट 2473.90 फूट
- 23/07/23 80.3 मि. मी. 990.9 मि. मी. 2468.80 फूट 2474.20 फूट









