रक्षाबंधन हा नाजूक भावनांची जपणूक करणारा दिवस आहे. भावाला बहिणीच्या भाबडय़ा प्रेमाची आठवण करून देणारा सण! त्यांच्यातील ऐक्मय, भाव वाढविणारा, सात्विक प्रेम देणारा, बंधुभाव वाढविणारा उत्सव आहे. फार दिवसांपासून आजतागायत ही ऐक्मयाची-बंधुभावाची जोपासना करण्याची उज्ज्वल परंपरा आहे.
भारतीय मनुष्य वृत्तीने, स्वभावाने उत्सवप्रिय आहे. त्यामुळे देशात सणांना तोटा नाही. सण, उत्सव हे भारतीयांच्या सामाजिक जीवनाचे एक अविभाज्य अंग आहे. कोणताही सण केवळ कौटुंबिक स्वरुपात साजरा करून त्याचे समाधान होत नाही व म्हणून समूहात जाऊन ते सामाजिक उत्सवाच्या स्वरुपात साजरा करतो.
हिंदूंचे सण व उत्सव यांची गणती केली तर ती खूप मोठी होईल. वास्तविक आपले खरे महत्त्वाचे सण म्हणजे राष्ट्रीय सण! आपल्या सण-उत्सवाचे सर्वसाधारणपणे तीन प्रकार करता येतील. धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीय! धार्मिक सणाद्वारे व्यक्तीची मानसिक, आध्यात्मिक, नैतिक उन्नती साधली जाते. यापैकी एक महत्त्वाचा आहे रक्षाबंधन! हृदयाची जवळीक करणारी, भावनांना गुंफणारी अंतःकरण सद्स्नेह भावना व आत्मियतेला जपणारी उज्ज्वल पवित्र परंपरा.
रक्षाबंधनदिनी महिला आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात. भाऊ त्या बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेतो. काही ठिकाणी गरीब माणसे श्रीमंतांच्या मनगटाला राखी बांधतात व त्यांच्याकडून स्व-संरक्षणाची इच्छा बाळगतात. असेच काही ठिकाणी नोकर मालकाच्या मनगटावर राखी बांधून स्वहित इच्छितात. एका रमणीने त्या वेळचा राजा हुमायून याला राखी बांधली. परस्पर भिन्न जाती, भिन्न जातीधर्म पण हुमायूनने राखीचे महत्त्व ओळखून अधिक सैन्यबळ असतानाही तिच्या राज्यावर हल्ला केला नाही. श्रीमंत अथवा मालक यांनी आपला मोठेपणा न विसरता त्याच्याकडून अवश्य राखी बांधून घ्यावी.
रक्षाबंधन हा नाजूक भावनांची जपणूक करणारा दिवस आहे. भावाला बहिणीच्या भाबडय़ा प्रेमाची आठवण करून देणारा सण! त्याच्यातील ऐक्मयभाव वाढविणारा, सात्विक प्रेम देणारा, बंधुभाव देणारा, वाढविणारा उत्सव आहे.
रक्षाबंधन या सणामध्ये नारळी पौर्णिमेच्या सणाची अधिक भर. जिकडे तिकडे पाणी, नद्या-नाले पाण्याने तुडुंब भरलेले, समुद्राला उधाण आलेले असते. अशा अथांग दूरवर पसरलेल्या सागराची या दिवशी पूजा होते. किनारास्थळी मोठे उत्सवाचे स्वरुप प्राप्त होते. पावसामुळे समुद्राला उधाण येऊन नाविकांच्या शिडांना विश्रांती मिळालेली असते. ती सुद्धा आजपासून समुद्रात सोडली जातात. नारळी पौर्णिमेच्या सणाप्रमाणे श्रावण महिन्याची निसर्गशोभा रक्षाबंधनाच्या शोभेला अधिक साज निर्माण करते.
व्यक्ती तितक्मया प्रवृत्ती! साऱयांच्या भावना सारख्याच असतात असे नाही. प्रत्येकाचे विचार सारखेच राहतील असेही नाही. समाजात वावरताना काही कारणावरून आपापसात क्षुल्लक कारणाने भांडणे होतात. पण ‘रक्षाबंधन’ या उत्सवानिमित्त क्लेश, शत्रुत्व, मत्सर, जातीभेद ही सारी दूर होतात. त्यांच्या ठिकाणी सद्भावना, ऐक्मय व परस्परामध्ये जिव्हाळा व आपुलकी जन्म घेते. ही जवळीक निर्माण व्हावी हाही रक्षाबंधनाचा दुसरा हेतू आहे. ‘रक्षाबंधन’! भावाने बहिणीचे रक्षण करण्याचे हे बंधन आहे. कर्तव्याचे कंकण आहे. हे कर्तव्य करीत असताना अनेक अडचणी, दुर्धर प्रसंग ओढवतात, वज्रासारख्या कठीण प्रसंगावर मात केली पाहिजे. माघार न घेता आपले कर्तव्य केले पाहिजे. दुःखे दूर करून, अडचणी बाजूला ठेवून बहिणीच्या हाकेला प्रतिसाद दिला पाहिजे. नाजूक रक्षाबंधनामध्ये महान असा गूढार्थ भरला आहे.
– प्रा. बळीराम ल. कानशिडे,
आनंदनगर वडगाव, बेळगाव









