लाडक्या बहिणींचा उत्साह, गोडधोडची रेलचेल : बालचमूंकडून लायटिंगच्या राख्यांना पसंती
बेळगाव : बहीण-भावाचं नातं अधिक दृढ करणारा रक्षाबंधन सण शहर परिसरात उत्साहात साजरा करण्यात आले. घरोघरी बहिणीकडून भावांना ओवाळून रेशमी धागा बांधण्यात आला. त्यामुळे बहीण-भावाच्या नात्यामध्ये उत्साह दिसून आला. काही भागात सकाळी तर काही ठिकाणी सायंकाळी रक्षाबंधन उत्साहात पार पडले. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी राखी खरेदीसाठी तरुणीसह महिलांची बाजारात गर्दी झाली होती. विशेषत: बहिणींनी भाऊरायासाठी राखीची खरेदी केली होती. बाजारपेठेत अलिकडे नवनवीन राख्यांची क्रेझ वाढली आहे.विशेषत: बालचमूंकडून लायटेंगच्या राख्यांना पसंती दिली जात आहे. त्यामुळे बालचमूंच्या हातावर लायटिंगच्या राख्याही चमकत होत्या. बाहेरगावी असणाऱ्या भावांसाठी बहिणींनी या पूर्वीच पोस्टाद्वारे राख्या पाठविल्या आहेत. तर काही ठिकाणी बहिणी भावाकडे तर भावाने बहिणीकडे जाऊन रक्षाबंधन सण साजरा केला. या निमित्ताने बहिणींनीही भावांना गोडधोड खाऊ घातले. सोमवारी शाळा आणि महाविद्यालयांमध्येही रक्षाबंधन उत्साहात पार पडले. त्याचबरोबर बालचमूंनी घरोघरी रक्षाबंधन केल्याने उत्साह अधिक दिसून येत होता.
मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये रक्षाबंधन
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही रक्षाबंधन साजरे करण्यात आले. दोनशेहून अधिक मुली, महिला यांनी प्रशिक्षणार्थी जवान तसेच अधिकाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा आनंद साजरा केला. ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व विद्यार्थिनी व महिलांचे स्वागत केले. बेळगाव परिसरातील विविध एनजीओचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रशिक्षणार्थी अग्निवीरांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.









