प्रतिनिधी/ बेळगाव
आदर्शनगर येथील संजीवीनी पुनर्वसन केंद्रातील मनोरुग्णांनी सुंदर आणि सुबक अशा कलात्मक जवळपास 500 राख्या बनविल्या आहेत. या राख्या विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यापासून मिळणारे उत्पन्न सामाजिक कार्यासाठी वापरले जाणार आहे. राखी बनविणे हा उपचाराचा एक भाग असल्याची माहिती संजीवीनी फौंडेशनच्या संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ यांनी दिली.
मनोरुग्ण औषधोपचाराने थोडे स्थिर झाल्यानंतर व्यवसाय उपचार विभागात त्यांना दाखल करणे गरजेचे असते. त्यानुसार त्यांच्या पुनर्वसनासाठी संजीवीनी काम करत आहे. मनातील भीती दूर होऊन ऊग्ण स्वावलंबी व्हावा म्हणून व्यवसाय उपचारतज्ञ विविध उपक्रम व समुपदेशन करतात. सामूहिक उपक्रमांतून सामाजिक कौशल्ये वाढीस लागतात, ज्याचा त्यांना पुढे पुनर्वसनात उपयोग होतो. या उपक्रमातून राख्या बनविल्या जात आहेत.
या बनविलेल्या राख्या खरेदी करून त्यांच्या पुनर्वसनासाठी हातभार लावावा. त्यांना जीवन जगण्यासाठी सक्षम करण्याच्या प्रक्रियेचा भाग व्हा, असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. राखी खरेदी करण्यासाठी संजीवीनी फौंडेशनच्या प्रशासन विभागाच्या 6360474629 या क्रमांकावर संपर्क साधावा.









