प्रतिनिधी/ बेळगाव
बहीण-भावातील नाते दृढ करणारा राखी पौर्णिमा सण शनिवारी उत्साहात साजरा झाला. बहिणींनी भावांना राखी बांधून ओवाळणी केली. भावांनी ऐपतीप्रमाणे बहिणींना सप्रेम भेट दिली. रोकड, साडी, दागिने यासारख्यांचा सप्रेम भेटीमध्ये समावेश होता. त्यानंतर बहीण-भावांसह घरातील सर्व सदस्यांनी मिष्टान्नाचा आस्वाद घेतला.
भगिनींकडून राखी पौर्णिमेची तयारी मागील 8 दिवसांपासून सुरू होती. परगावी राहणाऱ्या भावांना पोस्ट, कुरिअरद्वारे राख्या पाठविण्यात आल्या. राखी पौर्णिमा हा हिंदूंचा एक लोकप्रिय वार्षिक सण असून जो देशभरातच नव्हे तर विदेशात राहणाऱ्या हिंदू बंधू-भगिनी साजरा करतात. राखी बांधणे याला गहन अर्थ आहे. ही राखी भगिनेच्या भावांकडून त्यांचे रक्षण करण्याचे प्रतीक मानले जाते. ‘रक्षाबंधन’ याचा अर्थ ‘संरक्षणाचे बंधन’ असा आहे. भावाच्या उजव्या मनगटाला भगिनी राखी बांधून आपले रक्षण करण्याची विनंती भावाला करतात. तसेच भावाला दीर्घायुष्य लाभो, सुख लाभो अशी मनोकामनाही असते. रक्षाबंधनाची सुरुवात सत्ययुगात झाली असे म्हटले जाते. तर कोठे माता लक्ष्मी व महाराजा बळी यांनी रक्षाबंधनाची सुरुवात केली असे सांगितले जाते. देशात हा सण अनादी कालापासून अव्याहतपणे साजरा होत आला आहे. भाऊ-बहिणीच्या नात्याचे महत्त्व स्मरण करून देणाऱ्या या सणाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. राखी पौर्णिमेच्या निमित्ताने शनिवारी शहर आणि परिसरात उत्साहाचे वातावरण दिसून आले.









