जलाशय परिसरात पावसाचा जोर
प्रतिनिधी /बेळगाव
जून महिना कोरडा गेल्याने राकसकोप जलाशयातील पाणीसाठा संपुष्टात आला होता. केवळ 10 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक असताना पावसाला सुरुवात झाली आहे. राकसकोप जलाशय परिसरात पावसाचा जोर वाढल्याने मागील सोमवारपासून मार्कंडेय नदी प्रवाहित झाली होती. त्यामुळे आठवडय़ाभरात तब्बल 10 फुटाने राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
या जलाशयातील पाणीसाठा कमी झाल्याने पाणीपुरवठय़ात कपात करण्यास प्रारंभ करण्यात आला होता. केवळ 10 दिवस पुरेल इतका पाणीसाठा असल्याने शहरवासियांना पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. जून महिन्यात पाऊस झाला नसल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती. पण मागील दहा दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने सोमवार दि. 4 पासून मार्कंडेय नदी प्रवाहित झाली होती. पहिल्याच दिवशी राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत 6 इंचांनी वाढ झाली होती. दि. 4 रोजी सकाळी 8 वा. 2451.8 फूट पाणीपातळी होती. सलग आठवडाभर पावसाचा जोर कायम आहे. विश्रांती न घेता पडलेल्या पावसामुळे राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. रविवारी सकाळपर्यंत राकसकोप जलाशयाची पाणीपातळी 2461.5 फूट झाली होती. आठवडय़ाभरात राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत 10 फुटाने वाढ झाली आहे. जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पाणीटंचाईची चिंता मिटली आहे.









