भिंतींना तडे गेल्याने पाणीसाठ्यात घट : दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष
बेळगाव : बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या भिंतींना तडे गेले आहेत. यामुळे भिंती कमकुवत झाल्या असून पाणी साठविण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीचे काम करणे आवश्यक होते. परंतु, पाटबंधारे विभागाने कानाडोळा केल्याने पुढील वर्षीही कमी प्रमाणात पाण्याचा साठा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बेळगावपासून 22 किलोमीटर अंतरावर मार्कंडेय नदीवर 1960 मध्ये राकसकोप जलाशय बांधण्यात आले. बेळगाव शहराला दररोज 53 एमएलडी पाणी या जलाशयातून पुरविले जाते. पाणीपुरवठा विभागाकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. तर धरणाच्या देखभालीची जबाबदारी पाटबंधारे विभागाकडे आहे. मागील वर्षी एका खासगी संस्थेकडून जलाशयाचा सर्व्हे केला. या सर्व्हेमध्ये जलाशयाला अनेक ठिकाणी तडे गेल्याची माहिती उघड झाली. वास्तविक पाहता पावसाळ्यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी भिंतीला तडे गेले आहेत तेथे दुरुस्तीचे काम करणे आवश्यक होते. परंतु, याकडे दुर्लक्ष झाल्याने पुढील वर्षीही पाणीसाठा कमी होणार आहे. काही वषर्पूंर्वीपयर्तिं 2478 फुटांवर असणारा पाणीसाठा आता 2476 फुटांवर म्हणजे दोन फुटांनी कमी भरत आहे. हे दोन फूट पाणी बेळगाव शहराला तीन महिने पुरते. त्यामुळे इतका पाणीसाठा या भेगांमुळे वाहून जात आहे. बेळगाव शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पाण्याची गरजही वाढली आहे. रोज 53 एमएलडी गरज असताना केवळ 30 एमएलडी पाणीपुरवठा राकसकोप जलाशयातून होत आहे. त्यामुळे भविष्यातील विचार करता भिंतीच्या भेगा भरण्यासह गळती आहे दूर करणे गरजेचे आहे. जागतिक बँकेकडे दुरुस्तीसाठी मदतीचा अर्ज करण्यात आला आहे. जागतिक बँकेने निधी मंजूर केल्यास दुरुस्ती केली जाईल, असे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे.
सर्व्हेमध्ये निदर्शनास
राकसकोप जलाशयाच्या भिंतींना तडे गेल्याचे सर्व्हेमध्ये दिसून आले आहे. यामुळे मागील वर्षी जलाशयाचा पाणीसाठा कमी झाला आहे.
– अशोक बुर्ली (कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग)









