विरोधी पक्षांकडून महाभियोग प्रस्तावाची तयारी : जया बच्चन ठरल्या कारणीभूत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विरोधी पक्ष आता राज्यसभा सभापती जगदीप धनखड यंच्या विरोधात अनुच्छेद 67 अंतर्गत महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी करत आहे. राज्यसभेत शुक्रवारी समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी सभापती धनखड यांच्या कथित ‘टोन’वर हरकत घेतली. तर धनखड हे जया बच्चन यांच्यावर भडकले आणि त्यांनी मर्यादा राखून वागण्याचा सल्ला दिला. यानंतर विरोधी पक्षांनी ‘दादागिरी नाही चालणार’ असा नारा देत सभात्याग केल आहे.
तर राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या वर्तनाला बेताल ठरवत सत्तारुढ पक्षाने मांडलेला निंदा प्रस्ताव संमत झाला आहे. गोंधळ आणि निंदा प्रस्तावानंतर राज्यसभेचे कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आले होते.
अनुच्छेद 67 (ब) नुसार उपराष्ट्रपतींना राज्यसभेच्या सर्व तत्कालीन सदस्यांच्या बहुमताद्वारे संमत आणि लोकसभेकडून सहमत एका प्रस्तावाद्वारे त्यांच्या कार्यालयातून हटविले जाऊ शकते. याकरता चौदा दिवसांची नोटीस द्यावी लागते.
कसा सुरू झाला वाद?
राज्यसभेत शून्यप्रहराचे कामकाज पूर्ण झाल्यावर प्रश्नोत्तराचा तास सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासंबंधी सदस्य घनश्याम तिवारी यांच्याकडून करण्यात आलेल्या टिप्पणीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. ही टिप्पणी आक्षेपार्ह असल्याचा दावा करत काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी सभापतींना तुमचे रुलिंग काय अशी विचारणा केली. याच्या उत्तरादाखल सभापतींनी मल्लिकार्जुन खर्गे आणि तिवारी दोघेही माझ्या दालनात आले होते आणि त्यावर चर्चा झाल्याचे सांगितले. तिवारी यांनी आक्षेपार्ह बोललो असेन तर सभागृहाची माफी मागण्यास तयार असल्याची भूमिका घेतली. तर खर्गे हे टिप्पणीत काहीच आक्षेपार्ह नसल्यावर सहमत झाले असे सभापतींनी स्पष्ट केले. तरीही जयराम रमेश यांनी माफीची मागणी केली. यावर सभापतींनी प्रशंसेसाठी कुणीच माफी मागत नसल्याचे म्हटले. यानंतर काँग्रेसचे प्रमोद तिवारी यांनी संबंधिताचा टोन विरोधी पक्षाच्या नेत्यासाठी योग्य नव्हता असा दावा केला.
सेलिब्रिटी असलात म्हणून काय झालं?
मी एक अभिनेत्री आहे, देहबोली आणि हावभाव जाणते, तुमचा टोन योग्य नाही तसेच तो स्वीकारार्ह नाही असे विरोधी पक्षांच्या वतीने जया बच्चन यांनी म्हटले. बच्चन यांच्या या वक्तव्यानंतर सभापती धनखड भडकले. मी दरदिवशी तुमचे स्कूलिंग करू इच्छित नाही. तुम्ही माज्या टोनबद्दल बोलत आहात, हा प्रकार मी सहन करणार नाही. तुम्ही काहीही असलात तरी नियम पाळावे लागतील. तुम्ही सेलिब्रिटी असाल तरीही डेकोरम मानावाच लागेल असे धनखड यांनी बच्चन यांना सुनावले आहे.