भाजपकडून उत्तरप्रदेशच्या जागेसाठी उमेदवार घोषित
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेशात राज्यसभेच्या रिक्त झालेल्या एका जागेवर पोटनिवडणूक होणार असून याकरता भाजपने स्वत:च्या उमेदवाराची घोषणा केली आहे. भाजपने डॉ. दिनेश शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते हरद्वार दुबे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेकरता 15 सप्टेंबर रोजी उत्तरप्रदेशात राज्यसभा पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली आहे.
या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 5 सप्टेंबर असून उमेदवारी अर्जांची छाननी 6 सप्टेंबर रोजी केली जाणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 8 सप्टेंबर आहे. राज्यसभेच्या एका जागेवरील पोटनिवडणुकीकरता 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी पार पडणार आहे. उत्तरप्रदेशातून राज्यसभेवर गेलेले हरद्वार दुबे यांचे 26 जून रोजी दिल्लीत वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले होते.
दिनेश शर्मा हे 2017-22 दरम्यान योगी आदित्यनाथ सरकारच्या पहिल्या कार्यकाळात उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री राहिले होते. लखनौ विद्यापीठात वाणिज्य विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केलेल्या शर्मा यांनी सलग दोनवेळा लखनौचे महापौरपद भूषविले आहे. दिनेश शर्मा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विश्वासू सहकारी मानले जाते. याचमुळे शर्मा यांना आता राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली असण्याची शक्यता आहे.









