ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुंबई: राज्यसभेचा (Rajya Sabha Elections 2022) आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजपने (BJP) राज्यसभेचा तिसरा उमेदवार मागे घेऊन हि निवडणूक बिनविरोध करावी अशी मागणी महाविकास आघाडीची ( MahaVikas Aghadi)आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मविआच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. मात्र या भेटीनंतरही भाजप राज्यसभेची तिसरी जागा लढवण्यावर ठाम आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली आहे. शिवसेनेने कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक संजय पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपने देखील कोल्हापूरचेच माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. त्यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने देखील विजयाचा विश्वास व्यक्त केल्यानंतर यात घोडेबाजार होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. हे टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत विधानपरिषदेच्या जागा भाजपने लढाव्यात आणि राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करावी, असा प्रस्ताव ठेवल्याचे समोर येत आहे. मात्र भाजप राज्यसभेची तिसरी जागा लढवण्यावर ठाम असल्याची माहिती आहे.