बिहारच्या राजकारणात घडामोडींना वेग : हरिवंश हे मोदी अन् नितीश यांचे निकटवर्तीय
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय वाक्युद्धादरम्यान राज्यसभा उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमधील गुप्त चर्चा सुमारे एक तासभर चालली आहे. दोन्ही नेत्यांच्या कार्यालयाकडून यासंबंधी अद्याप कुठलीच औपचारिक माहिती जारी करण्यात आलेली नाही. संजदचे नेते देखील यासंबंधी काहीही बोलणे टाळत आहेत.
महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलथापालथ पाहता या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. हरिवंश नारायण सिंह यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार या दोघांचाही निकटवर्तीय म्हणून ओळखले जाते. याचमुळे हरिवंश हे संदेशवाहक म्हणून काम करू शकतात अशी चर्चा या भेटीनंतर राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. नितीश कुमार यांनी हरिवंश यांच्या स्वरुपात भाजपसोबत जुळवून घेण्याची एक शक्यता कायम ठेवल्याचा आरोप जनसुराजचे नेते प्रशांत किशोर यांनी यापूर्वीच केला आहे.
2017 मध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये केंद्रीय यंत्रणांनी तेजस्वी यादव आणि लालूप्रसाद यादव यांच्या विरोधात चौकशी सुरू केली होती. या पार्श्वभूमीवर नितीश यांनी राजदची साथ सोडून देत भाजपसोबत पुन्हा एकदा आघाडी केली होती. तेव्हा देखील हरिवंश यांनीच दोन्ही पक्षांमध्ये समेट घडवून आणली होती.
केंद्रीय यंत्रणांनी आता पुन्हा एकदा लालूप्रसाद यादवांच्या कुटुंबावरील कारवाईचा विळखा घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. लँड फॉर जॉब प्रकरणी आरोपी म्हणून उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे नाव आरोपपत्रात सामील आहे. हे आरोपपत्र सोमवारीच दाखल झाले आहे. या पार्श्वभूमीवर हरिवंश यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात बदल घडून येणार असल्याची चर्चा दबक्या सूरात सुरू आहे.
पक्ष आमदार-खासदारांच्या गाठीभेटी
नितीश कुमार हे मागील काही दिवसांपासून स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. सर्वप्रथम त्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. यानंतर पक्ष आमदारांशी त्यांनी चर्चा केली होती. मागील तीन दिवसांपासून नितीश हे पक्षाच्या लोकसभा अन् राज्यसभा खासदारांची चर्चा करत आहेत. यामुळे या भेटीगाठींचे टायमिंग अन् तेजस्वी यादवांवरील आरोपपत्र पाहता अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. या भेटींमध्ये मुख्यमंत्री केवळ संबंधित मतदारसंघांच्या समस्या जाणून घेत असल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.









