पुणे / प्रतिनिधी :
आपण महाविकास आघाडी आणि भाजपा यापैकी कुणासोबतही नसून, केवळ शेतकऱ्यांसोबत आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने यांना लोक धडा शिकवतील व आपण निवडून येऊ, असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.
साखर संकुल येथे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची थकीत एफआरपी व अन्य प्रश्नांवर त्यांनी भेट घेत चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी त्यांच्यासमवेत संघटनेचे प्रकाश बालवडकर, बापूसाहेब कारंडे, सुरेंद्र पंढरपूरे, गणेश महाजन, ऍड. योगेश पांडे व संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने हे शिंदे गटात गेले असून त्यांच्या घरावर शिवसेनेने मोर्चा काढल्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, माने यांना लोक धडा शिकविणार, यात तिळमात्र शंका नाही. आपण कोणत्याही पक्षासोबत नाही. केवळ शेतकरीहित हीच आपली भूमिका आहे. या खेपेला आपण नक्कीच विजयी होऊ.
सध्याच्या सरकारात कृषीमंत्रीच नाहीत
राज्य सरकारवर टीका करताना शेट्टी म्हणाले, सत्तेच्या सारीपाटवर राजकारणी खेळत असताना शेतकरी मात्र संकटात आहे. खरीप हंगामापूर्वी महाविकास आघाडीमधील कृषिमंत्री हवाबदलासाठी गुवाहाटी येथे गेले आणि आतातर सध्याच्या सरकारमध्ये कृषिमंत्रीच नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शेतकरी प्रश्नाकडे तत्काळ लक्ष द्यावे. कारण राज्यातील 23 जिह्यातील 8 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. दोनच मंत्र्यांचे सरकार काम करत आहे. बोगस बियाणांचा सुळसुळाट झाला. असून रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
एकरकमी एफआरपीशिवाय हंगाम सुरू होऊ देणार नाही
शेतकऱ्यांना उसाची एफआरपी एकरकमीच मिळाली पाहिजे, ही आमची मागणी असून, आगामी हंगाम त्याशिवाय सुरू करू देणार नसल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. राज्यात अद्यापही एफआरपीचे 1 हजार 536 कोटी शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. ही उसाची थकीत रक्कम शेतकऱ्यांना व्याजासह देण्याची मागणी साखर आयुक्तांकडे केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या दोन टप्प्यात एफआरपी देण्याच्या कायद्यास आम्ही उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. कारखाने उसाच्या वजनात काटामारी करतात, दोन-दोन टन ऊस कमी दाखविला जातो, त्यासाठी ऑईल कंपन्यांच्या पेट्रोल पंपाना एकच संगणक प्रणालीचा उपयोग साखर कारखान्यांत करण्याची मागणी आम्ही केली आहे. तसेच त्याचा पासवर्ड साखर आयुक्तांकडे ठेवावा, अशी मागणीही केली असून साखर आयुक्तांनी सकारात्मकता दर्शविली असल्याचे शेट्टी म्हणाले.
हेही वाचा : अन्यथा, देशाची अवस्था श्रीलंकेसारखी होईल