कारखाना सुरु होऊ देणार नाही
वारणानगर / प्रतिनिधी
इथेनॉलच्या उत्पादनाचा वाटा शेतकऱ्यांना मिळणार नसेल तर ते बंद करा, चारशे रुपये फरक शेतकर्यांना दिलाच पाहिजे अन्यथा साखर कारखाना सुरु होऊ देणार नाही असा इशारा माजी खा. राजू शेट्टी यानी दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेली आक्रोश पदयात्रा मंगळवार दि.२४ रोजी रात्री वारणानगर ता. पन्हाळा येथील वारणा सह. साखर कारखान्यावर पोहचली. शेतकरी भवन समोरील सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे, छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला शेट्टी यांनी पुष्पहार अर्पण केला.यावेळी त्यांनी कारखाना संचालकांना निवेदन दिले.
याप्रसंगी बोलताना राजू शेट्टी म्हणाले साखर कारखानदारांनी ७० टक्के शिल्लक साखर मार्चनंतर चढ्या दराने विकली त्यामुळे साखरेच्या चढ्या दराचा ४०० रुपये फरक शेतकऱ्यांना दिल्याशिवाय साखरेचा एक कणही बाहेर पडू देणार नाही तसेच कारखाना सुरू करू देणार नाही असा इशारा दिला.
जागतिक बाजारपेठेत सध्या साडे सहा हजार रुपये क्विंटल साखरेला दर आहे. मात्र केंद्र शासनाने निर्यात बंदी केली आहे. जर साखर कारखानदारांनी व राज्य शासनाने निर्यात बंदी बाबत केंद्राकडे आवाज उठवला असता तर देशातील कारखान्यांच्या साखरेला पाच हजार रुपये क्विंटल दर मिळाला असता असे सांगितले.
पाच वर्षापूर्वी एफआरपीनुसार ऊसाचा दर २८०० रूपये टन होता. यात केवळ २०० रूपये वाढ झाली आहे. कारखान्यांनी शिल्लक साखरेचे मुल्यांकन मनमानी व फसवे दिले आहेत. याची चौकशी व्हावी. तसेच इथेनॉल निर्मिती करताना एक टक्का रिकव्हरी जाते. त्या उत्पादनाचा वाटा शेतकऱ्यांना मिळणार नसेल तर इथेनॉल कशाला पाहिजे ? ते बंद करून साखर निर्मिती करा त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल असे राजू शेट्टी यानी सांगितले.
प्रारंभी राजु शेट्टी यांचे स्वागत संचालक रवींद्र जाधव, शहाजी पाटील किशोर पाटील यांनी केले. त्यानंतर निवेदन स्वीकारले. यावेळी संचालक सुभाष जाधव, विजय पाटील तोडकर, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, अजित पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
वारणानगर ता. पन्हाळा येथे माजी खा. राजू शेट्टी, वैभव कांबळे,अजित पाटील यांचेकडून निवेदन स्विकारताना वारणा साखर कारखान्याचे संचालक रविंद्र जाधव,सुभाष जाधव,विजय पाटील व इतर









