कोल्हापूर :
शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करणाऱ्या राजू शेट्टी यांनी मला दातृत्व शिकवण्याची गरज नाही, असा जोरदार टोला आमदार राजेश क्षीरसागर यांनी लगावला आहे. “कोरोना आणि महापुराच्या काळात राजू शेट्टी कोणत्या बिळात लपले होते, हे कोल्हापुरकरांनी पाहिले आहे. आज दातृत्वाची भाषा करणारे त्यावेळी कुठे होते?” असा सवालही त्यांनी केला.
क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले की, “कोल्हापुरातील जनता माझं कुटुंब आहे. कोरोना आणि महापुराच्या संकटात मी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून सेवा केली. जीवनावश्यक वस्तू पोहोचविल्या, बचाव कार्यात सहभागी झालो. मी काय दान केलं आहे, ते वेळोवेळी माध्यमांमधून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे राजू शेट्टींसारख्या दलबदलू नेत्यांकडून मला दातृत्व शिकायची गरज नाही.”
ते पुढे म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे सूत्र आम्ही आजही पाळतो. जनतेच्या पाठबळावर मी निवडून आलो आहे, आणि त्याच जनतेनेच राजू शेट्टींना सलग दुसऱ्यांदा घरी बसवलं आहे.”
क्षीरसागर यांनी आरोप केला की, “राजू शेट्टी यांनी माझ्या वडिलांच्या वैद्यकीय खर्चाबाबत खोटे आरोप केले. हे आरोप जर त्यांनी सिद्ध केले तर मी राजकारणातून संन्यास घेईन. पण ते सिद्ध करू शकले नाहीत, त्यामुळे त्यांनीच आता राजकीय संन्यास घ्यावा.”
“साखर कारखानदारांवर टीका करणारे शेट्टी स्वतः कारखाना चालवत नाहीत. दूध संघ स्थापन करून शेतकऱ्यांना कमी दर देतात. आंदोलने करून प्रसिद्धी मिळवण्याचा त्यांचा नेहमीचा प्रकार आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
- शरद जोशींच्या पाठीवर खंजीर
“एफआरपीचा खरा जनक शरद जोशी होते. पण शेट्टींनी त्यांच्या पाठीवर खंजीर खुपसून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. ज्यांच्या बळावर सत्ता उपभोगली त्याच शेतकऱ्यांना आज बाजूला करत आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
- महायुती सरकारचा विकासाचा अजेंडा
क्षीरसागर म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार विकासाचे काम करत आहे. कोल्हापूर जिल्ह्याला कोट्यवधींचा निधी मंजूर झाला आहे आणि बरीच कामे पूर्णत्वास जात आहेत.”
“राजू शेट्टी वैफल्यग्रस्त झाले असून, केवळ प्रसिद्धीसाठी खोटे आरोप करत आहेत. त्यांच्या आरोपांकडे लक्ष देण्याऐवजी मी माझा वेळ जनतेच्या हितासाठी खर्च करणार आहे,” असेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
“आई अंबाबाईचे दर्शन घेऊन त्यांनी स्वतःसाठी सुबुद्धी मागावी,” असा उपरोधिक सल्लाही त्यांनी शेवटी दिला








