13 तारखेच्या आक्रोश मोर्चाला शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील स्टाईलने आवाहन
रवींद्र केसरकर कुरुंदवाड
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. एक जुलैपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर ते जमा होणार होते. मात्र अद्याप ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. या पार्श्वभूमीवर येत्या 13 जुलै रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय माजी खासदार राजू शेट्टी यांनी घेतलाय. यासाठी ते शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करत असून या अनुषंगाने त्यांनी आज सांगोल्याचे आमदार शहाजीबापू यांच्या स्टाईलने शेतकऱ्यांना या आक्रोश मोर्चासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन व्हिडिओद्वारे केले आहे.
अधिक वाचा- अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देणार- मुख्यमंत्री शिंदे
त्यांनी या व्हायरल व्हिडिओमध्ये “मी काय गुहाटीत नाही मी दख्खनचा राजा ज्योतिबा च्या पायथ्याशी उभा आहे. काय ती काँग्रेस…काय ती राष्ट्रवादी…काय ते भाजप…काय ते शिवसेना…काय तो शिंदे गट हे सार ओके आहे. 50 कोटी पण ओके आहेत…पण नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे 50 हजार कुठे आहेत ? असा प्रश्न उपस्थित करून मी तुम्हाला आव्हान करतो…विनंती करतो…पन्नास हजार जर वसूल करायचे असतील तर 13 जुलैला पाऊस असो काहीही असो मोठ्या संख्येने कोल्हापूरला दसरा चौकात बारा वाजता या नाहीतर तुमचा कार्यक्रम ओके होणार हे ठरलेल आहे हे लक्षात ठेवा” असे आवाहन त्यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या स्टाईल मध्ये केले आहे. या व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून याबाबत चांगली चर्चा रंगली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने लढणाऱ्या या शेतकरी नेत्यालाही आमदार शहाजी बापू पाटील यांच्या डायलॉगची भुरळ पडली असल्याची चर्चा रंगू लागली आहे









