प्रतिनिधी,सातारा
Raju Shetti News : सध्या राजकीय सभा घेवून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांचे वस्त्रहरण करण्यात मशगुल आहेत.त्यांनी गारपीठीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल,आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत कशी मिळेल यावर बोलायला हवे. परंतु ते होताना दिसत नाही. त्यामुळे या राजकीय धुळवडीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना अलिप्त आहे. पवारसाहेबांची आठवड्याला वक्तव्य बदलतात. त्यांच्या वक्तव्याला कितीवेळा प्रतिक्रिया द्यायच्या असा प्रश्न निर्माण झालेला आहे.शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून 9 महिने उलटले तरीही ऊस दर समितीची बैठक झालेली नाही, असे परखड मत माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी साताऱ्यात व्यक्त केले. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले, पवारसाहेब साताऱ्यातच पावसात भिजत भिजत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना म्हणाले आपल्याला शेतकऱ्यांच्यासाठी ही महाविकास आघाडी करायची आहे आणि सगळय़ा शेतकऱ्यांनी महाविकास आघाडीला साथ द्यावी. मृगाच्या पहिल्या पावसात जशी ढेकळ विरघळावी तसे या पवारांच्या भिजलेल्या भाषणामुळे महाराष्ट्राला शेतकरी विरळला आणि महाविकास आघाडीला ताकद दिली. त्याच्यानंतर पुढे काय घडले हे महाराष्ट्राने पाहिले. आठवडय़ाला पवार साहेबांचे वक्तव्य बदलत राहिल्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर किती प्रतिक्रिया द्यायच्या हा प्रश्न निर्माण झालेला आहे,असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
राजकारणाबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले, प्रचलित राजकारण्याबाबत अतिशय वाईट प्रतिक्रिया सामान्यांच्यामध्ये आहेत.आजकाला राजकारणांचा विषय काढला तरीही पहिली शिवी देतात अन् मग चर्चा सुरु होते.अशी वाईट प्रतिमा सध्याची राजकारणाची झाली आहे. इतकी वाईट प्रतिमा महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झाली नव्हती.आजकाल लोकांनी राजकीय बातम्या वाचण, ऐकणही सोडून दिलेलं आहे. इतका किळसवाणा प्रकार लोकांना बघवत नाही तरी सुद्धा सुधारतील ते राजकारणी कसले असे म्हणावे लागेल. महाविकास आघाडीच्या सभा होत आहेत.विरोधकांनी विरोधकांची बाजू मांडली पाहिजे.या सभामध्ये एकमेकांची वस्त्रहरण करण्यापेक्षा गारपीठीने हैराण झालेला शेतकरी,अवकाळीने हैराण झालेला शेतकरी,शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा वाढलेली महागाई,रासायनिक खताचे वाढलेले भाव,हे जे मुलभूत प्रश्न आहेत त्यावर महाविकास आघाडीच्या सभेत भाषण झाली असती, त्यावर चर्चा झाली असती तर शेतकऱ्यांना आपुलकी वाटली असती. तसे यांनी काही केले नाही.सगळे भेदलेले आहेत.ईडी कधी येईल,सीबीआय कधी येईल सांगता येत नाही म्हणून यांनी त्यांच्यावर वार करायचा त्यांनी यांच्यावर वार करायचा. एकमेकांचे वस्त्रहरण करायचे याच्या पालिकडे काही चालले नाही.त्यामुळे या सगळया राजकीय धुळवडीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना अलिप्त असल्याचेही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना आम्हाला भेटायला वेळ नाही.त्यांना भेटले तर ते हो करतो एवढेच बोलत असतात. त्यांनाही कितपत अधिकार आहेत माहिती नाही.महाविकास आघाडी सरकारच्या काळात बेकायदेशीररित्या राज्याला अधिकार नसताना एफआरपीचे दोन तुकडे करण्याचा निर्णय घेतला होता.तो रद्द करण्याचा शासन निर्णय अद्याप झालेला नाही.त्यानंतर मंत्रालयात जावून सात आठ वेळा पाठपुरावा केला अजूनही कार्यवाही झालेली नाही. अशी सरकारची अकार्यक्षमता दिसून येत आहे.गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाचा अंतिम भाव हा रंगराजन समितीच्या फॉम्युल्याप्रमाणे मिळालेला नाही. त्या दराला मान्यता देण्यासाठी ऊस दर समितीची बैठक झालेली नाही. शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात येवून 9 महिने झाले तरीही उस दर समिती स्थापन नाही. समिती अस्तित्वात नसल्याने एकही मिटींग झाली नाही.अतिंम बिलापोटी शेतकऱ्यांना जे पैसे मिळणार आहेत ते मिळाले नाही. शेतकऱ्यांचे ते पैसे बिनव्याजी वापरत आहेत. हे सरकार चाललय कोणासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Previous ArticleBAMS डॉक्टरांना रक्तपेढीमध्ये सहायक वैद्यकीय अधिकारी म्हणून मान्यता द्या ; प्रकाश घुंगुरकरांची मागणी
Next Article दिल्ली कॅपिटल्सने साकारला दुसरा विजय,








