हायकमांडच्या यादीवर मुख्यमंत्र्यांसमोर नाराजी : बदल नसल्याचे आश्वासन
बेंगळूर : दोन दिवसांपूर्वी काँग्रेस हायकमांडने कर्नाटकातील विविध 39 निगम-महामंडळे, प्राधिकरणांवरील अध्यक्षांच्या निवडीची यादी जाहीर केली होती. या यादीत वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन निगमच्या (एनडब्ल्यूकेआरटीसी) अध्यक्षपदी अरुण पाटील यांचे नाव होते. यामुळे कागवाडचे आमदार राजू कागे यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली होती. अखेर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजू कागे हेच यापुढेही वायव्य परिवहन निगमचे अध्यक्ष राहतील, असे स्पष्ट केले .
आमदार राजू कागे यांच्याकडे वायव्य रस्ते परिवहन निगमचे अध्यक्षपद होते. दोन दिवसांपूर्वी हायकमांडने जारी केलेल्या यादीत राजू कागे यांच्या जागी अरुण पाटील यांची नेमणूक केली. यामुळे राजू कागे यांना धक्का बसला. त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन यावर चर्चा केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी छपाईतील समस्येमुळे ही चूक झाली आहे. वायव्य परिवहन निगमचे अध्यक्षपद तुमच्याकडेच राहील, असे सांगितल्याचे समजते.
जून महिन्यात आमदार राजू कागे यांनी राज्य सरकारबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. सरकारकडून विकासकामे होत नाहीत. आमदारांनी सांगितलेली कामे होत नाहीत, अशी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. हा विषय अनेक दिवस चर्चेत होता. दरम्यान, बुधवारी काँग्रेस हायकमांडने राजू कागे यांना वायव्य परिवहन निगमच्या अध्यक्षपदावरून हटवून अरुण पाटील यांची नेमणूक केली. याविषयी राजू कागे यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
हायकमांडने पाठवलेल्या यादीत बदल
निगम-महामंडळे आणि प्राधिकरणांवर अध्यक्ष नेमणुकीसंबंधी शुक्रवारी राज्य सरकारने अधिकृत आदेश जारी केला. मात्र, या यादीत काही बदल करण्यात आले असून 34 जणांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. वायव्य परिवहनच्या अध्यक्षपदी राजू कागेच राहतील. बेंगळूर शहर परिवहनच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे प्रवक्ते निकेतराज मौर्य यांना स्थान देण्यात आले आहे. कल्याण कर्नाटक परिवहन निगमवर अरुणकुमार पाटील यांना नेमण्यात आले आहे. काँग्रेसश्रेष्ठींनी पाठविलेल्या यादीत या कल्याण कर्नाटक परिवहन निगमसाठी निलकंठ मुळगे यांचे नाव होते. आता ते बदलण्यात आले आहे.









