वृत्तसंस्था / नवी दिल्ली
येथे सुरू असलेल्या पहिल्या तिरंदाजी प्रीमियर लीग स्पर्धेत राजपुताना रॉयल्सने आपली विजयी घोडदौड कायम राखताना चेरो आर्चर्सचा शूटऑफमध्ये पराभव केला. तर काकतीया नाईट्सने या स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदविला. या स्पर्धेत पावसाचा अडथळा आल्याने काही सामने लांबणीवर टाकण्यात आले.
मायटी मराठाजने पृथ्वीराज योद्धाजचा 6-2 अशा गुणांनी पराभव केला. तत्पूर्वी काकतीया नाईट्सने चोला चीफ्सचे आव्हान 5-3 असे संपुष्टात आणले. काकतीया नाईट्सचा हा स्पर्धेतील पहिला विजय आहे. राजपुताना रॉयल्स आणि चेरो आर्चर्स यांच्यातील सामना निर्धारीत वेळेत 4-4 असा बरोबरीत राहिला. त्यानंतर शूटऑफमध्ये त्यांनी चेरो आर्चर्सवर विजय नोंदविला. काकतीया नाईट्सने चोला चीफ्सचा 77-75, 75-75, 75-70, 73-75 असा पराभव केला.









