वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के अतिरिक्त कर लादल्यानंतर केंद्र सरकार प्रत्युत्तर देण्याच्या मन:स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह काही काळानंतर अमेरिकेला भेट देणार होते. तथापि, सरकारच्या जवळच्या व्यक्तींच्या हवाल्याने प्राप्त माहितीनुसार राजनाथ सिंह यांचा अमेरिका दौरा रद्द करण्यात आला आहे. राजनाथ यांच्या दौऱ्यात भारताकडून काही संरक्षण खरेदीची घोषणा केली जाणार होती. ही खरेदी थांबवण्यासाठी लेखी सूचना देण्यात आलेल्या नसल्या तरी या व्यवहारासंबंधी तात्काळ आपली भूमिका बदलण्याचा पर्याय असल्याचे दिसून येते. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या निर्यातीवर कर लादल्यानंतर भारतात असंतोषाचे हे पहिले ठोस लक्षण आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणल्याचे दिसून येत आहे.









