महत्त्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी केनियाचे संरक्षणमंत्री अदन बेयर डुएले यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीत भाग घेतला आहे. भारताने आफ्रिकन देशांसोबतच्या संबंधांना प्राथमिकता दिली आहे. पंतप्रधान मोदींनी भारताच्या अध्यक्षतेखालील आगामी शिखर परिषदेत आफ्रिकन महासंघाला जी-20 सदस्यत्व प्रदान करण्यासाठी सर्व जी-20 सदस्य देशांना पत्र लिहिले असल्याचे राजनाथ सिंह यांनी बैठकीत म्हटले आहे.
जुलै 2023 मध्ये केनियाच्या आयएमओ (आंतरराष्ट्रीय सागरी संघटना)च्या महासचिव पदासाठी केनियाला समर्थन दिले होते असे राजनाथ यांनी बैठकीला संबोधित करताना नमूद केले आहे. या बैठकीपूर्वी केनियाचे संरक्षणमंत्री अदन बेयर डुएले यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
चंद्राच्या दक्षिण ध्रूवावर चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगसाठी आम्ही भारताचे अभिनंदन करतो. अशाप्रकारची कामगिरी करणाऱ्या 4 निवडक देशांच्या गटात भारत सामील झाल्याने आम्ही आनंदी आहोत. भारत आणि केनिया यांच्यातील सौहार्दपूर्ण संबंधांची आम्ही प्रशंसा करतो. आमच्या देशात मोठ्या संख्येत भारतीय वंशाचे लोक राहतात. पंतप्रधान मोदींनी 2017 मध्ये आमच्या देशाचा केलेला दौरा हा ऐतिहासिक स्वरुपाचा होता असे उद्गार डुएले यांनी काढले आहेत.









