रमण सिंह विरोधात भूपेश बघेल यांचा निकटवर्तीय
छत्तीसगडमधील सर्वात हॉट सीट राजनादंगावमधील मतदारांच्या नजरेत येथील लढाई रमण सिंह विरुद्ध भूपेश बघेल अशीच असणार आहे. काँग्रेसचे उमेदवार गिरिश देवांगण हे केवळ नावापुरती उमेदवार असतील. सलग तीनवेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले रमण सिंह हे 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर एकदा खासदार म्हणून निवडून आले असून केंद्रीय मंत्रीही राहिले आहेत. वर्तमान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे निकटवर्तीय गिरिश देवांगण हे छत्तीसगड खनिज विकास महामंडळाचे अध्यक्ष असून पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. राजनांदगावमध्ये काँग्रेसने 5 स्थानिक नेत्यांची दावेदारी फेटाळत रायपूरचे रहिवासी असलेले गिरिश यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे स्थानिक नेत्यांमध्ये मोठी नाराजी आहे. स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार असा प्रचार भाजपकडून केला जातोय. परंतु गिरिश देवांगण हे राजनांदगाव हे आपले आजोळ असल्याचे सांगत या प्रचाराला प्रत्युत्तर देऊ पाहत आहेत. 2018 च्या निवडणुकीत रमण सिंह यांनी काँग्रेसच्या उमेदवार आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाची करुणा शुक्ला यांना 16,933 मतांनी पराभूत केले होते. यावेळीही या मतदारसंघात रमण सिंह यांचेच पारडे जड दिसून येत आहे.









