पुण्यतिथीदिनी प्रदेश काँग्रेसकडून श्रद्धांजली
पणजी : देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी राष्ट्र आणि गोव्यासाठी मोठे योगदान दिले असून आजच्या तऊणांनी ते जाणून घेतले पाहिजे, असे आवाहन प्रदेश काँग्रेसतर्फे करण्यात आले. राजीव गांधी यांना रविवारी पुण्यतिथीदिनी श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित कार्यक्रमात पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम बांबोळी येथील गोमेकॉ संकुलातील पुतळ्याला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर पणजीतील काँग्रेस हाऊसमध्येही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बांबोळी येथील कार्यक्रमादरम्यान प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दहशतवादाविऊद्ध लढा आणि समाजात शांतता जपण्याची शपथ सर्वांना दिली. त्यानंतर पणजीत आयोजित कार्यक्रमात बोलताना पाटकर यांनी, भाजपकडून काँग्रेसबद्दल होणाऱ्या अपप्रचाराचा समाचार घेतला. काँग्रेस राजवटीत भारतात कोणताही विकास झाला नाही हा भाजपचा दावा म्हणजे थोतांड असून याऊलट आज भाजपनेच लोकशाहीची हत्या केली आहे. जातीय द्वेष फोफावला आहे. लोकांचा आवाज दाबण्यात येत आहे, असे ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी बोलताना, आज भारतासह जगभरात हा दिवस दहशतवाद विरोधीदिन म्हणून पाळला जात असल्याचे सांगितले. जगण्यासाठी शांतता महत्वाची असून हीच शांतता बिघडवणाऱ्या दहशतवादाचा नायनाट करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी आपल्या भाषणात, राजीव गांधी हे आधुनिक भारताचे शिल्पकार होते, असे सांगितले. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. 18 वर्षे वयोगटातील तऊणांना मतदानाचा हक्क देणारेही तेच होते, असे ते पुढे म्हणाले. कार्लूस फॅरेरा, गुऊदास नाटेकर, विरियटो फर्नांडिस, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, सुभाष फळदेसाई, सावियो डिसोझा, डॉ. वीरेंद्र शिरोडकर व सावियो डिसिल्वा, महिला प्रमुख बीना नाईक, युवा उपाध्यक्ष विवेक डिसिल्वा यांच्यासह अन्य पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते. एम के शेख यांनी सूत्रसंचालन केले तर प्रसार माध्यम विभाग अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी आभार मानले.









