दक्षिणेतील राज्यात प्रभाव वाढविण्याची तयारी
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
भाजपने केरळमध्ये स्वत:चा विस्तार करणे आणि निवडणुकांमध्ये अधिक यश मिळविण्यासाठी पक्षाची धुरा माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांना सोपविली आहे. भाजपचे केंद्रीय पर्यवक्षेक प्रल्हाद जोशी यांनी पक्षाच्या राज्य परिषदेच्या बैठकीदरम्यान राजीव चंद्रशेखर यांच्या नावाची भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली आहे.
चंद्रशेखर यांच्याकडे राजकारणातील दोन दशकांपेक्षा अधिक अनुभव आहे. तो माहिती-तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, कौशल्य विकास आणि उद्योजकता, जलशक्ती विभागाचे केंद्रीय मंत्री राहिले आहेत. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या नियुक्तीमुळे भाजपला केरळमध्ये मोठा लाभ होणार असल्याचे मानले जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी चंद्रशेखर यांनी मुख्यालयात दोन सेटमध्ये अर्ज दाखल केला. केंद्रीय पर्यवेक्षकांनी वर्तमान प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन आणि राज्य भाजपचे प्रभारी प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. सुरेंद्रन यांनी व्यासपीठावर चंद्रशेखर यांना पक्षाचा झेंडा सोपविला.
भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने केरळ भाजपचा पुढील अध्यक्ष म्हणून माजी खासदार चंद्रशेखर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. यानंतर सोमवारी भाजपचे केंद्रीय पर्यवेक्षक प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखालील कोअर कमिटीच्या बैठकीत या निर्णयाला अंतिम रुप देण्यात आले. चंद्रशेखर यांना भाजपच्या नेतृत्वाचे मजबूत समर्थन प्राप्त होते असे बोलले जात आहे.
मागील 10 वर्षांमध्ये केरळमध्ये भाजपने अभूतपूर्व प्रगती केली आहे. चंद्रशेखर यांच निवड सर्व नेत्यांच्या सर्वसंमतीने करण्यात आली आहे. विविध क्षेत्रांमधील त्यांचा अनुभव आणि प्रावीण्य राज्यात भाजपच्या विकासाला वेग देणार आहे. चंद्रशेखर हे स्वत:च्या नव्या भूमिकेत चमकू शकतात असे के. सुरेंद्रन यांनी म्हटले आहे. तर केंद्रीय मंत्री आणि केरळमधील भाजपचे एकमेव खासदार सुरेश गोपी यांनी चंद्रशेखर यांच्या नेतृत्वात केरळ भाजप मोठी घौडदौड करणार असल्याचे उद्गार काढले आहेत.
थरूर यांच्याकडून पराभूत
60 वर्षीय चंद्रशेखरन यांना दोन दशकांचा राजकीय अनुभव आहे. चंद्रशेखर तीनवेळा कर्नाटकातून राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत. याचबरोबर त्यांनी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. वर्तमान काळात ते रालोआच्या केरळ शाखेचे उपाध्यक्ष आहेत. रालोआचे उमेदवार म्हणून चंद्रशेखर यांनी 2024 मध्ये तिरुअनंतपुरम मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतु काँग्रेस नेते शशी थरूर यांनी त्यांचा 16,077 मतांनी पराभव केला होता. चंद्रशेखर यांचा जन्म अहमदाबाद येथील केरळच्या दांपत्याच्या पोटी झाला होता. दांपत्य मूळचे त्रिशूरचे रहिवासी होते. बीपीएल समुहाचे संस्थापक टीपीजी नांबियार हे चंद्रशेखर यांचे सासरे आहेत.









