अयोध्येच्या दौऱ्यावर दाक्षिणात्य सुपरस्टार : राम मंदिर उभारणी कार्याची केली पाहणी
वृत्तसंस्था/ अयोध्या
दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांनी रविवारी श्रीराम जन्मभूमीतील तात्पुरत्या मंदिरात विराजमान श्रीरामल्लाचे दर्शन घेत पूजा केली आहे. यावेळी त्यांच्या पत्नी देखील सोबत होत्या. राम मंदिराची उभारणी अत्यंत योग्यप्रकारे सुरू आहे. अनेक दिवसांपासून रामलल्लाचे दर्शन घेण्याची इच्छा होती, आज त्यांचे दर्शन घेऊन मी धन्य झालो असे उद्गार रजनीकांत यांनी काढले आहेत. याचबरोबर त्यांनी भव्य राम मंदिराच्या निर्मितीस्थळाला भेट देत मंदिर उभारणीची पाहणी केली आहे.
रजनीकांत यांनी अयोध्येत सर्वप्रथम हनुमानगढीत जात दर्शन घेतले. तेथे महंत ज्ञानदास यांचे शिष्य पुजारी हेमंत दास यांनी रजनीकांत यांचे स्वागत केले. रजनीकांत यांनी हनुमानगढीत आरती केली असून यावेळी त्यांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या.
राम जन्मभूमी परिसरात रजनीकांत यांचे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या विश्वस्तांनी स्वागत केले. तर मंदिर उभारणीचे कार्य पाहून रजनीकांत यांनी आनंद व्यक्त केला. प्रभू रामाची इच्छा असल्यास मंदिर उभारणी पूर्ण झाल्यावर पुन्हा भव्य मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी येईन असे रजनीकांत यांनी म्हटले आहे. यादरम्यान रजनीकांत यांना मंदिर ट्रस्टकडून मंदिराचे प्रारुप प्रदान करण्यात आले. रजनीकांत यांच्या अयोध्याभेटीमुळे आता दाक्षिणात्य कलाकारांचे अयोध्येसाठीचे आकर्षण वाढणार आहे.
मंदिर उभारणीस प्रारंभ झाल्यावर अयोध्येत जात रामलल्ला तसेच हनुमानगढीचे दर्शन घेणारे रजनीकांत हे दुसरे दाक्षिणात्य सुपरस्टार ठरले आहेत. यापूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासने अयोध्येत स्वत:च्या आदिपुरुष चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला होता. तसेच त्याने अभिनेत्री क्रीति सेनॉनसोबत रामलल्लाचे दर्शन घेतले होते.
योगी आदित्यनाथांच्या चरणांना स्पर्श
रजनीकांत हे शुक्रवारी लखनौमध्ये पोहोचले होते. सर्वप्रथम राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट त्यांनी घेतली होती. तर शनिवारी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या चरणांना त्यांनी केलेला स्पर्श चर्चेचा विषय ठरला आहे. योगी आदित्यनाथ हे संत परंपरेशी संबंधित असल्याने रजनीकांत यांनी चरणस्पर्श करत लोकांची मने जिंकली आहेत. तर रजनीकांत यांनी रविवारी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची भेट घेतली आहे.









