वार्ताहर /धामणे
राजहंसगडावरील श्री सिद्धेश्वर मंदिरातील सिद्धेश्वर देवाच्या यात्रोत्सवाला प्रतिवर्षाप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त सुरुवात झाली. येथील देवस्थान पंचकमिटीच्या वतीने रविवार दि. 30 रोजी सकाळी 6 वा. अभिषेक घालण्यात येवून सिद्धेश्वर देवाचे विधीवत पूजन करण्यात आले. पुजनप्रसंगी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण थोरवत व सर्व सदस्य आणि राजहंसगड गावातील व भाविक याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर पालखीचे पूजन करण्यात आले.नारळ उडविण्याचा कार्यक्रम दुपारी 3 वा. गावातील सर्व भाविक आणि देवस्थान पंचकमिटी आपापल्या बैलजोडी सजवून सवाद्य मिरवणूक राजहंसगडावर येवून मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यात आली. त्यानंतर देवाचे विधीवत पूजन करून मंदिरासमोर नारळ उडविण्याचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी गडावरील मंदिरातील पालखी मिरवणुकीने येवून गावातील मंदिर आवारात मिरवणुकीची सांगता झाली. सोमवार दि. 31 रोजी सकाळी बैलजोड्यांची सवाद्य मिरवणूक निघून सायंकाळी यात्रोत्सवाची सांगता होणार आहे. यंदा पंचक्रोषीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यात्रेनिमित्त पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. यात्रा पार पाडण्यासाठी देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण थोरवत, हणमंत नावगेकर, सिद्धाप्पा छत्रे, बसवंत पवार, गुरुदास लोखंडे, गंगाधर पवार आदींनी परिश्रम घेतले.









