प्रतिनिधी /फोंडा
गोवा राज्य दुग्ध उत्पादक संघ म्हणजेच गोवा डेअरीच्या अध्यक्षपदी राजेश फळदेसाई यांची बिनविरोध निवड झाली आहे. काल सोमवारी अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत बारा संचालकामधून फळदेसाई यांचा एकमेव अर्ज आला होता. सहकार खात्याचे राजू मगदूम यांनी निर्वाचन अधिकारी म्हणून काम पाहिले.
गेल्या 19 जून रोजी झालेल्या गोवा डेअरीच्या निवडणुकीत राजेश फळदेसाई व विठोबा देसाई यांच्या संयुक्त पॅनलमधील बारा पैकी नऊ उमेदवार विजयी झाले होते. याच पॅनलमधील राजेश फळदेसाई यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. यावेळी राजेश फळदेसाई यांच्यासह विठोबा देसाई, उल्हास सिनारी, विजयकांत गांवकर, गुरुदास परब, बाबुराव फट्टो देसाई, उदय प्रभू, नितीन प्रभूगावकर, बाबू फाळो, माधव सहकारी, अनुप देसाई व श्रीकांत नाईक हे सर्व बाराही संचालक उपस्थित होते. तब्बल तीन वर्षे गोवा डेअरीचा ताबा प्रशासक व सरकार नियुक्त त्रिसदस्यीय समितीकडे राहिल्यानंतर आता डेअरीला स्वतंत्र संचालक मंडळ लाभले आहे. राजेश फळदेसाई हे अडणे-केपे येथील सोमनाथ दूध संस्थेचे प्रतिनिधी असून यापूर्वी 1 मे ते ऑगस्ट 2017 असे चार महिने ते गोवा डेअरीचे अध्यक्ष होते. अध्यक्षपदाची त्यांची ही दुसरी कारकिर्द आहे.
डेअरीची विस्कटलेली आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणणार
सध्या गोवा डेअरीची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक बनली असून बाजारात डेअरीच्या दुधाचा तुटवडा आहे. मागणी असूनही ग्राहकांना डेअरीचे दूध मिळत नाही. पशुखाद्य प्रकल्पही बऱयाच काळापासून बंद आहे. येत्या पंधरा दिवसात या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन डेअरीची विस्कटलेली आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी नूतन संचालक मंडळाचा प्रयत्न राहील. त्यासाठी शेतकऱयांशीही चर्चा केली जाणार आहे. अध्यक्षपदाच्या खुर्चीचा दुरोपयोग होणार नाही असे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी आपल्या निवडीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.









