विजयकुमार दळवी चंदगड
Rajesh Patil चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार गटात सामील झाल्याने इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेवेळी काँग्रेस सोडून शरद पवारांबरोबर राष्ट्रवादीत जाणारे पहिले आमदार स्व. नरसिंगराव पाटील होते. दुर्दैवाने त्यांच्या पुढच्याच निवडणुकीत स्व. नरसिंगराव पाटील यांना जनसुराज्यच्या तिकीटावर निवडणूक लढवावी लागली होती. जसे 2004 साली स्व. नरसिंगराव पाटील यांनी शरद पवारांना सोडले. त्याचीच पुनरावृत्ती आमदार राजेश पाटील यांच्याकडून झाल्याने राष्ट्रवादीला आगामी निवडणुकीत नवा चेहरा शोधावा लागणार आहे. आमदार राजेश पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटातून स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभुळकर, विनायक उर्फ अप्पी पाटील हे भविष्यात उमेदवार असू शकतील, अशी चर्चा मतदार संघात रंगली आहे.
चंदगड तालुक्याचे राजकारण नेहमीच व्यक्तीनिष्ठ स्वरूपाचे राहिले आहे. तालुक्यात कधीच पक्षीय राजकारण रूजलेले नाही. तालुक्याच्या नेत्यांनी आपल्या राजकीय प्रवासात अनेक पक्षांचा प्रवास केलेला आहे. चंदगड तालुक्यातील आमदार राजेश पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार पाटील यांना कोणताही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. तर पाठींब्यावरून गडहिंग्लज तालुक्याच्या राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. शरद पवारांचे नेतृत्व मानून पक्षावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात जाण्यास नकार दिला आहे. काही कार्यकर्त्यांनी मुंबईतील मेळाव्याला हजेरी लावून शरद पवारांच्या पाठिशी राहू, अशी ग्वाही दिली आहे. मतदार संघाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्या गटात आमदार राजेश पाटील यांनी जावे, हा निर्णय राजेश पाटलांच्या किचन पॅबिनेटमधल्या कार्यकर्त्यांनी घेतला असला तरी तो सर्वानाच मान्य असणे बंधनकारक नाही. चौकशींचा ससेमिरा चुकविण्यासाठी राष्ट्रवादीतील प्रमुख नेतेच अजित पवारांबरोबर गेलेले असले तरी आमदार पाटलांना कधी ईडीची नोटीसी आलेली नव्हती, वा कधी राजकीय कोंडीत पकडण्याचाही प्रयत्न झाला नव्हता. स्व. नरसिंगराव पाटलांचे चिरंजीव म्हणून शरद पवारांनी त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली होती. गडहिंग्लज तालुक्याची संपूर्ण राष्ट्रवादीची टीम राजेश पाटलांना निवडून आणण्यासाठी कामाला लावली होती. चंदगड तालुक्यात राष्ट्रवादीला मते कमी पडूनही गडहिंग्लज तालुक्यातील राष्ट्रवादीच्या मतांमुळे राजेश पाटील आमदार झालेले आहेत, तरीही त्यांनी उपमुख्यमंत्री पवार गटात केलेला प्रवेश अनेकांना वेदना देणारा ठरला आहे.
चंदगड मतदार संघात राजेश पाटील यांनी सुमारे 520 कोटींचा विकासनिधी आणला आहे. त्यातील सर्वाधिक निधी उपमुख्यमंत्री पवार यांनीच दिलेला असल्यामुळे राजेश पाटलांनी अजित पवारांबरोबर जाणे, योग्य असल्याचे अनेक कार्यकर्ते समर्थन करीत आहेत. मात्र भविष्यात राजकीय चित्र बदलू शकते. भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाच्या आघाडीचे उमेदवार आमदार राजेश पाटील असणार आहेत. त्यामुळे शिवाजीराव पाटील, संग्रामसिंह कुपेकर, माजी मंत्री भरमू पाटील हे नेमके काय करणार ? हाही नवा प्रश्न निर्माण होणार आहे. उध्दव ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्या आघाडी विरूध्द भाजपा, शिंदे गट, अजित पवार गट अशी लढत अपेक्षित आहे. भाजपा-अजित पवार गटाचे स्टॅडिंग आमदारांच्या तत्वाने राजेश पाटील यांना उमेदवारी फायनल होईल. पण विरोधात उध्दव ठाकरे, शरद पवार, काँग्रेस आघाडीतून अप्पी उर्फ विनायक पाटील, नंदिनी बाभुळकर, प्रा. सुनील शिंत्रे, गोपाळराव पाटील, विलास पाटील या नावांचा विचार होऊ शकतो. सध्य परिस्थितीत आमदार राजेश पाटलांच्या उपमुख्यमंत्री पवार गटातील प्रवेशाने जसे अनेकांचे स्वप्न उध्वस्त झाली आहेत. तसेच अनेकांच्या आशाही पल्लवीत झाल्या आहेत, एवढे मात्र नक्की.









