प्रतिनिधी,कोल्हापूर
राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारामध्ये मंत्रीपदासाठी मी दावेदार आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असे मत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी माझ्यासारख्या शिवसैनिकाला नेहमीच बळ दिले आहे, भरीव निधी दिला आहे. त्यांना माझ्या कार्याविषयी देखील माहिती आहे, असेही क्षीरसागर म्हणाले.
क्षीरसागर यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पत्रकारांनी मंत्रिमंडळ विस्ताराविषयी छेडले असता ते म्हणाले, बाळासाहेबांची शिवसेना पश्चिम महाराष्ट्रात वाढविण्यासाठी पाठबळ देण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे धोरण आहे. त्यासाठीची जबाबदारी कडवट शिवसैनिक म्हणून माझ्यावर सोपविली आहे. त्यासाठी पक्ष बळकट करण्यासाठी मी त्यांच्या आदेशानुसार कार्यरत आहे.
राज्य नियोजन मंडळाच्या माध्यमातून राज्यातील विकासाच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका पार पाडण्याची जबाबदारीही मुख्यमंत्री शिंदे यांनी माझ्याकडे कायम ठेवली आहे. या मंडळाला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना माझ्या कार्याची माहिती आहे. ते जे जबाबदारी देतील ती पार पाडण्याचे कर्तव्य आम्ही पार पाडणार आहोत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. कडवट शिवसैनिक म्हणून माझा मंत्रीपदावर क्लेम आहे. मुख्यमंत्री माझ्यावर अन्याय करणार नाहीत. ते जो निर्णय घेतील, त्याप्रमाणे कार्य करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
जितेंद्र आव्हाड यांचे आरोप निराधार
राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद आव्हाड यांनी राज्य सरकारवर केलेले आरोप निराधार आहेत. पोलिसांनी कारवाई केली आहे. जर कारवाईबद्दल आव्हाडांना आक्षेप असेल तर त्यांनी न्यायालयात जावे, निराधार आरोप करून नाटक करू नये, असे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
Previous Articleभाऊसाहेब नामकरणाचा निर्णय पुढे नेणार
Next Article ‘इफ्फीत’ तब्बल 280 चित्रपटांची पर्वणी









