राहुल गडकर,प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या ताब्यात कधी नाही ते महत्त्वाचे बदल होताना दिसताहेत.पर्यावरणाच्या दृष्टीने पाऊल टाकत एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यात “शिवाई” या इलेक्ट्रिक बसची एन्ट्री केली.राज्यभरात हा कुतूहलाचा विषय असला तरी कोल्हापुरात मात्र त्यावरून राजकारण सुरू झाले आहे.
कोल्हापूर विभागीय मंडळाला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे चार शिवाई बस मिळाल्या आहेत. या बस कोल्हापूर ते पुणे मार्गावर धावणार आहेत. त्याचा शुभारंभ नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून आमदार जयश्री जाधव यांना आमंत्रित केले होते. तोच धागा पकडून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी इतर लोकप्रतिनिधींना आमंत्रित का केले नाही? यावरून कोल्हापूर विभागीय मंडळाच्या अधिकाऱ्यांची आज खरडपट्टी केली. सामान्य प्रशासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, आमदार, मंत्री, खासदार, मंत्री दर्जा प्रतिनिधींना पत्रिका काढून आमंत्रित करणे अपेक्षित होते. मात्र अधिकाऱ्यांनी तसे न करता या बसेचा उद्घाटन कार्यक्रम उरकून का घेतला. तुमचे सामान्य प्रशासन विभागाकडे तक्रार करतो, असे खडे बोल सुनावत क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना खडसावले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात या बसेस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. शिवाय एकनाथ शिंदे यांच्याकडेच या महामंडळाचे मंत्रीपद आहे. तरीही विभागीय मंडळाकडून शिंदे गटाच्या एकाही प्रतिनिधीला का निमंत्रण दिले नाही? याचा जाब क्षीरसागर यांनी विचारला.यावर अधिकाऱ्यांशी बोलती बंद झाली. झालेली चूक मान्य करत अधिकारी क्षीरसागर यांच्या ऑफिस मधून बाहेर पडले.गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर एसटी महामंडळाचा कारभार वारंवार चव्हाट्यावर येत आहे. अधिकाऱ्यांची मनमर्जी, दुर्लक्षपणामुळे कोल्हापूर विभाग टीकेचा धनी बनत आहे.








