अमिताभ बच्चन यांच्या नातवासोबत झळकणार
राजेश खन्ना यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर वेगळाच ठसा उमटविला आहे. आता त्यांची नात नाओमिका सरन देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तयार आहे. दिनेश विजान हे बॉलिवूडमध्ये एक नवी जोडी सादर करणार आहेत. ही नवी जोडी बॉलिवूडचे दोन आयकॉनिक स्टार राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांचा वारसा एकत्र आणेल. दिनेश विजान हे राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची नात नाओमिका सरन आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांच्यासोबत एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट निर्माण करणार आहेत. चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. परंतु याची निर्मिती मॅडॉक फिल्म्सच्या अंतर्गत केली जाईल.
जगदीप सिद्धू हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. यापूर्वी त्यांनी अनेक चित्रपटांसाठी संवादलेखन केले आहे. या चित्रपटात रोमान्स, प्रभावी संगीत, डान्स आणि एका चांगल्या कहाणीचे मिश्रण पहायला मिळणार आहे. नाओमिकाचे वय सध्या 21 वर्षे असून ती राजेश खन्ना यांची कन्या रिंकी अन् उद्योजक समीर सरन यांची मुलगी आहे. नाओमिकाने यापूर्वीच अभिनेत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांनी आनंद तसेच नमक हराम यासारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.
नाओमिकासाठी हा पदार्पणाचा चित्रपट असेल तर अगस्त्यने यापूर्वीच नेटफ्लिक्सची सीरिज आर्चीजद्वारे पदार्पण केले आहे. अगस्त्य सध्या श्रीराम राघवन यांचा चित्रपट इक्कीसचे चित्रिकरण करत आहे. हा एक बायोपिक असून याची कहाणी अरुण खेत्रपाल यांच्यावर आधारित आहे.









