सातारा :
सातारा शहरातील स्ट्रीट लाईट सकाळी 9 वाजेपर्यंत सुरुच राहतात. त्यामुळे वीजेचा अपव्यय होत असून विनाकारण वीज वाया जात आहे. वीज वाचवा देश वाचवा अशा आशयाचे पोस्ट सवयभान चळवळीचे राजेंद्र चोरगे यांनी सकाळी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्याच पोस्टच्या अनुषंगाने सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी लगेच विद्युत विभागाचे अभियंता अविनाश शिंदे यांना फोन करुन सूचना दिल्या. त्यांनीही संबंधितास दुरुस्ती तत्काळ करण्यास फर्मावताच संपूर्ण टीम कामाला लागली. सायंकाळी उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम विद्युत विभागाकडून सुरु होते.

सातारा नगरपालिकेच्यावतीने गणेशोत्सवाच्या अनुषंगाने राजपथावर बसवण्यात आलेल्या दिव्यांची दुरुस्ती सुरु आहे. गेल्या चार दिवसांपासून हे काम सुरु आहे. त्यातच सकाळी बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांची एक पोस्ट बुधवारी सकाळी व्हायरल झाली. त्या पोस्टमधील मजकुर जयहिंद वीज बचत म्हणजेच वीज निर्मिती डीसीसी बँक ते जुना आरटीओ चौक दरम्यान 50 लाईट खांब आहेत. आणि त्यावर 100 दिवे आहेत. प्रत्येकी 50 वॅट म्हणजे 5000 एकूण वॅटचे दिवे आहेत. गेले 3 महिने सकाळी कमीत कमी 9 वाजेपर्यंत सुरू असतात. सकाळी 7 वाजता पावसाळ्यात पूर्ण उजेड पडतो. म्हणजे सकाळी 7 ते 9 विनाकारण लाईट सुरू असते. म्हणजे 5000 वॅट रोज 2 तास असे 3 महिने म्हणजे 90 दिवस रोज 2 तास म्हणजे 180 तास लाईट विनाकारण वाया जात आहे? श्री बालाजी ट्रस्ट सवयभान, अशी पोस्ट व्हायरल होताच त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर काहींनी तीच पोस्ट व्हायरल केली. त्याच अनुषंगाने लगेच सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी विद्युत विभागाचे अभियंता अविनाश शिंदे यांना फोनकरुन सूचना केली. अभियंता शिंदे हे सुट्टीवर असले तरीही त्यांनी लगेच संबंधितास दुरुस्तीच्या सूचना दिल्या. दिवसभर काम सुरु होते असे त्यांनी सांगितले.








