ऑनलाईन टीम / तरुण भारत :
उत्तराखंडमधील माजी मंत्री राजेंद्र बहुगुणा यांनी राहत्या घरी छातीवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. बहुगुणा यांच्यावर नातीचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप त्यांच्या सुनेने केला होता. त्यानंतर बहुगुणा यांच्यावर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून ते अस्वस्थ होते.
बहुगुणा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी पोलिसांना फोन करून बोलावले. पोलिसांच्या समोर ते ओव्हरहेड पाण्याच्या टाकीवर चढले. पोलिसांनी त्यांना लाऊडस्पीकरच्या साहाय्याने समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आपण निष्कलंक असल्याचा दावा करत पिस्तुलाने छातीवर गोळी झाडली. पोलिसांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बहुगुणा यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. दरम्यान, बहुगुणा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या मुलाने पत्नीविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार बहुगुणा यांच्या सुनेवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
एनडी तिवारी यांच्या कार्यकाळात होते मंत्री
राजेंद्र बहुगुणा हे हल्दानी येथील रोडवेज युनियनचे नेते होते. एनडी तिवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री असताना बहुगुणा यांना 2004 ते 2005 या काळात त्यांना राज्य मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला होता.









