वृत्तसंस्था/थिरुवनंतपुरम
गोव्याचे राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची नियुक्ती केरळच्या राज्यपालपदी करण्यात आली आहे. यापूर्वी ते बिहारचे राज्यपाल होते. गुरुवारी आर्लेकर यांना केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नितीन मधुकर जामदार यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ देवविली. या कार्यक्रमाला केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही. डी. सथीशन, तसेच ज्येष्ठ राजकीय नेते, प्रशासकीय उच्चाधिकारी आणि इतर मान्यवर राजभवनात उपस्थित होते.
राज्यपालपदाची शपथ घेताना आर्लेकर यांनी केरळची पारंपरिक वेषभूषा धारण केली होती. त्यांनी परमेश्वराला स्मरुन शपथ घेतली. ते केरळचे 23 वे राज्यपाल झाले आहेत. यापूर्वी केरळच्या राज्यपाल पदी अरीफ मोहम्मद खान हे होते. त्यांची नियुक्ती आता बिहारचे राज्यपाल म्हणून करण्यात आली आहे. तर बिहारच्या राज्यपालपदी असणारे आर्लेकर यांची नियुक्ती केरळ राज्यपाल म्हणून झाली आहे.
आर्लेकरांचा अल्पपरिचय
वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केलेले 70 वर्षांचे राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे मूळचे गोव्याचे आहेत. ते बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. गोव्यात भारतीय जनता पक्ष नावारुपाला आणण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. ते 2012 ते 2015 या काळात गोव्याच्या विधानसभेचे अध्यक्षही होते. तसेच ते गोव्याच्या मंत्रिमंडळाचेही सदस्य होते. 2015 ते 2017 या काळात त्यांच्याकडे वन आणि पर्यावरण हे विभाग होते. त्यांचा विवाह अनघा यांच्याशी झाला असून त्यांना दोन अपत्ये आहेत. गेली अनेक वर्षे ते राज्यपालपदी आहेत.









