“तरुण भारत सलोखा परिषद” अनेक पक्ष, संघटनांचा सूर
भोंग्यावरुन वादंग निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण गढूळ बनले आहे. राज्यातील जिल्हय़ा जिल्हय़ात अशी परिस्थिती निर्माण होत असली तरी शांत, संयमी साताऱ्याची परंपरा कायम राखत सलोखा राखणार असल्याचे ‘तरुण भारत’ने आयोजित केलेल्या सलोखा परिषदेत अनेक धर्म, पक्ष व संघटनांतर्फे सांगण्यात आले आहे. सातारा शहर आणि जिल्हय़ात वादंग होणार नाही. साताऱयाचे वातावरण सलोख्याचे आणि सौदाहार्याचे राहिल, असा सूर सर्वांनी आळवला आहे.
सर्वांनी सुसंस्कृतपणा दाखवावा
भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. अशा या धर्मनिरपेक्ष देशामध्ये सगळे सलोख्याने नांदत आहेत. आपली ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, कुराण, बायबल असेल या प्रत्येक ग्रंथामध्ये मानवतावादी दृष्टीकोन अपेक्षित आहे. आपण माणूस आहोत. उद्या जर मला रक्ताची गरज पडली तेव्हा मी तपासत नाही कि कुठल्या धर्माचे, जातीचे आहे. त्यामुळे कृपया देशामध्ये शांतता नादेल. यासाठी सुसंस्कृतपणा सर्वांनी दाखवावा ही प्रामाणिक अपेक्षा आहे. -संगीता साळुंखे (माई),
राष्ट्वादी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस
‘तरुण भारत’ला धन्यवाद
खर तर मानवता हा एकच धर्म आहे. हिंदू मुस्लिम असा कोणताही भेदभाव नाही आणि नसावा. अनेक वर्षा पासून हिंदू मुस्लिम गुण्या गोविंदाने रहात आलेले आहेत. परंतु काही राजकीय पक्ष स्वतः च्या स्वार्था साठी आजारकता माजवण्याचे काम करीत आहेत. परंतु या विरोधात कोणी बोलायला तयार नाही. आजचा तरुण भारत वाचला खरंच मनाला समाधान वाटले. वाढत चाललेल्या या जातीय विष पेरणीला रोखण्याचं काम तरुण भारतने सलोखा परिषदच्या माध्यमातून सुरु केले असून ‘तरुण भारत’च्या या कार्याचे मनापासून धन्यवाद
-हाजी समीर बागवान
बंधुभावातील गोडी अबाधित
मराठा साम्राज्याची राजधानी असलेला हा सातारा जिल्हा आहे. शत्रूच्या कन्येच्या स्मरणार्थ मस्जिदीची स्थापना करणे हा राजघराण्याने दिलेला आदर्श व मुस्लिम बांधवांसाठी महाराजांनी उभारलेली शाही मस्जिद ही हिंदू मुस्लिम बंधूभावाचे व प्रेमाचे ऐतिहासिक प्रतीक असून तोच इतिहास सातारकर आजतागायत जपत आलेले आहेत. रमजान मे हैं राम आणि दिवाली मे हैं अली ही सातारावासीयांची भावना भविष्यातही कायम राहील व ती जपण्याचा नेहमीप्रमाणे प्रयत्न सातारचा मुस्लिम बांधव करत राहील. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सातारा कसल्याही प्रकारचा अनिष्ट प्रकार घडून देणार नाही व बंधूभाव अबाधित राहील हा ठाम विश्वास आहे व ह्या बंधुभावातील गोडी ‘तरुण भारत’च्या उपक्रमाने वृद्धिंगत होईल
-सादिकभाई शेख,
सामाजिक कार्यकर्ता
सातारा शांतताप्रिय आहे
साताऱ्याला एक वेगळी संस्कृती, परंपरा आहे, सातारा हा शांतताप्रिय आहे. जातीय भेद सातारकरांमध्ये कधीच मानला जात नाही. परंतु काही विघ्नसंतोषी नागरिकांद्वारे समाजामध्ये जातीय वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. सातारकरांनी याला महत्व देऊ नये. अशा प्रकारांचा नाहक त्रास हा सर्वसामान्य नागरिकांना सर्वाधिक प्रमाणात होतो. भविष्यात साताऱयाला दंगलीसारखा डाग लागु नये याकरीता प्रत्येक सातारकरांनी प्रयत्न केले पाहिजे.
-सचिन मोहिते
शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष
साताऱ्यातील हिंदू-मुस्लिम ऐक्याने देशाला दिशा दिलीय
सातारानगरीतील हिंदू मुस्लिम ऐक्याने देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. देशात ज्या ज्या वेळेस दंगली उसळल्या त्या त्या वेळेस हिंदू मुस्लिम बांधव व सामाजिक कार्यकर्ते हातात हात घालून दोन्ही समाजाच्या समोर गेले आणि राज्याला व देशाला बंधूभावाची शिकवण दिली. आजही आपापसातील ऋणानुबंध घट्ट आहेत व कोरोनाच्या महामारीत ते आणखीन घट्ट झाले आहेत. कोव्हिडमध्ये ‘खिदमत ए खल्क’च्या माध्यमातून अल्लाहने जी समाजसेवा पार पाडली. माणुसकी हाच धर्म आहे ह्याची शिकवण देतो व वेळोवेळी प्रचित्तीही देतो. जिह्यातील जातीय सलोखा अबाधित राखण्यासाठी ‘तरुण भारत’ ने केलेल्या उपक्रमाचे व सर्व संयोजकाचे आभार.
-साजिद शेख,
चेअरमन,खिदमतए खल्क,गेंडामाळ कबरस्थान ट्रस्ट
मानवता हाच खरा धर्म
सातारा ही छत्रपती, शाहू महाराजांचा वारसा लाभलेली भूमी आहे, त्यामुळे येथे कधीच जातीय सलोख्याचा प्रश्न निर्माण झाला नाही. प्रत्येकाचे जे काही रितीरिवाज असतील ते पाळले गेलेच पाहिजे. शासनाने जे काही निर्बंध आहेत, त्यांचेही काटेकोरपणे पालन हे केलेच पाहिजे. तसेच राजकीय लाभ उठविण्याकरीता अशा प्रकारचा समाजात तेढ निर्माण करायचे जे प्रयत्न होतात. त्याला सामान्य माणसाने बळी पडु नये. कोणताही धर्म इतरांना त्रास द्या असे कधीच सांगत नाही. मानवता हाच खरा धर्म आहे, सातारकरांनी छत्रपतींची शिकवण कधीच विसरू नये. आम्ही आमच्या संघटनेत कधीच जातीय भेद आणत नाही.
-राजु शेळके,
स्वाभिमानी शेतकरी संघटना-जिल्हाध्यक्ष









