वृत्तसंस्था/ कॅलगेरी (कॅनडा)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरु असलेल्या कॅनडा खुल्या सुपर 500 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या प्रियांशू राजावतचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले.
या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या रविवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या अॅलेक्स लेनिरने राजावतचा 21-17, 21-10 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. हा उपांत्य फेरीचा सामना 45 मिनिटे चालला होता. गेल्या वर्षी झालेल्या माद्रिद स्पेन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत राजावतने लेनिरचा पराभव केला होता. या पराभवाची परतफेड लेनिरने कॅनडा बॅडमिंटन स्पर्धेत केली. या स्पर्धेत राजावतने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात डेन्मार्कच्या अनुभवी आणि सिडेड अँटोनसेनचा पराभव केला होता.









