ऑनलाईन टीम/तरुण भारत
देशात काही दिवसांपूर्वी झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.
या पराभवानंतर काँग्रेसकडून चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या चिंतन शिबिराला आजपासून सुरुवात होणार आहे. राजस्थानच्या उदयपूरमध्ये हे चिंतन शिबीर होणार आहे. दरम्यान, काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी नेतृत्व बदलाबाबत सूचना केली होती. त्यामुळे पक्ष तरूण आणि नवे चेहरे नेतृत्वाच्या पातळीवर आणण्याचा विचार पक्ष करेल, असे मानले जात आहे. पक्षाचे नेते काँग्रेसला तरुण पक्ष म्हणून नाव देण्यावर जोर देत आहेत. त्यासाठी संघटनेत पदे भूषविण्याच्या आणि सर्व स्तरावर निवडणुका लढवण्याच्या नेत्यांच्या वयोमर्यादेचा विचार केला जाईल. याशिवाय, पक्ष राज्यसभा सदस्यांसाठी मुदतीची मर्यादा निश्चित करण्याबाबतही गांभीर्याने विचार करण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस चिंतन शिबिराचे आयोजन केलं आहे. या चिंतन शिबिरामध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. काँग्रेसच्या अनेक बड्या चेहऱ्यांनी भाजप आणि इतर राजकीय पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसला मोठं नुकसान झालं आहे. तसेच निवडणुकांमधील काँग्रेसचं अपयश पाहता हे शिबिर नवी दिशा ठरवण्यासाठी महत्त्वाचे आहे. यावेळी काँग्रेसमध्ये एक परिवार एक तिकीट या विचारावर चर्चा होऊ शकते. सोनिया गांधी यांनी या चिंतन शिबिरासाठी जय्यत तयारी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
या विषयांवर होणार चर्चा…
काँग्रेसच्या या चिंतन शिबिराला दुपारी १२ वाजता सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. या चिंतन शिबिरामध्ये मोठे नेते उपस्थित राहणार आहे. तसेच देशातील काँग्रेसचे नेते येणार आहे. इतर समित्या सार्वजनिक क्षेत्रातील गूंतवणूक, वाढती महागाई, अल्पसंख्याकांच्या समस्या आणि महिलांच्या समस्यांवर चर्चा करतील. तर नवीन शैक्षणिक धोरण आणि वाढती बेरोजगारी यावर युवक चर्चा करणार आहेत. एमएसपी कायदेशीर करणे, कर्जमाफी आणि गव्हाची किंमत या मुद्द्यावर कृषी समिती चर्चा करणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि ब्लॉक स्तरावरील सुधारणांवर संघटना समितीकडून चर्चा केली जाईल. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक कुटुंब एक तिकीट धोरणही चर्चेच्या अजेंड्यावर आहे. काँग्रेसच्या तीन दिवसीय चिंतन शिबिरात जातीय ध्रुवीकरण, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आगामी निवडणुकीसाठी पक्ष मजबूत करण्यावर चर्चा होणार आहे.
या शिबिरामध्ये पक्षातील बदल, सत्ताधारी आणि विरोधकांचा सामना करण्यासाठी रणनिती ठरवण्यात येऊ शकते. तसेच आगामी निवडणुकांसाठी तयारी या मुख्य विषयांवर चर्चा होणार आहे. माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी ट्रेनने उदयपूरमध्ये दाखल झाले त्यांच्या स्वागतासाठी मध्यरात्रीपासून कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकावर गर्दी केली होती.