ऑनलाईन टीम/तरुण भारत
राजस्थानमध्ये अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) विरुद्ध सचिन पायलट (sachin pilot) असा संघर्ष निर्माण झाला असून पुन्हा एकदा राज्य सरकार संकटात अकडलं आहे. अशोक गेहलोत काँग्रेसचे नवे अध्यक्ष होण्याच्या तयारीत आहेत. पण निवडणूक लढण्याआधी त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यांनी राजीनामा दिल्यास सचिन पायलट मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. परंतु अशोक गेहलोत यांच्या समर्थक आमदारांचा मात्र याला विरोध असून ८२ आमदारांनी राजीनामा दिला आहे.
या बंडखोर आमदारांसोबत पक्षश्रेष्ठींची चर्चा सुरू आहे. या आमदारांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींसमोर दोन प्रमुख अटी ठेवल्या आहेत. २०२० च्या राजकीय संकटात सरकार वाचवण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांना मुख्यमंत्री बनवावं, अशी पहिली अट आमदारांनी घातली आहे. तर जोपर्यंत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होत नाही, तोपर्यंत आमदारांची बैठक बोलावू नये, अशी दुसरी अट ठेवण्यात आली आहे.या सत्तासंघर्षावर तोडगा काढण्यासाठी नेतृत्वाकडून प्रयत्न सुरु असताना सचिन पायलट यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : जॅकलीन फर्नांडिसला मोठा दिलासा! २०० कोटींच्या घोटाळाप्रकरणी अंतरिम जामीन मंजूर
सचिन पायलट यांनी आपण जयपूरमध्ये असून, दिल्लीत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच हायकमांडच निर्णय घेईल असंही सांगितलं आहे. ते म्हणाले “मी जयपूरमध्ये असून सध्या तरी दिल्लीला जाणार नाही. हायकमांडला त्यांचा निर्णय घेऊ दे, त्यानंतर मी माझा निर्णय घेईन”.
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांनी सर्व काही ठिक असल्याचं म्हटलं आहे. जयपूरमध्ये मध्य रात्री या सगळ्या नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. यामुळे राज्यात मुख्यमंत्री गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात सत्तेचा संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे.
राजस्थानमधील राजकीय स्थितीवर तोडगा काढण्यासाठी सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांनी मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) आणि अजय माकन (ajay maken) यांना पाठवलं असून, सविस्तर अहवाल देण्यास सांगतिलं असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, बंडखोर आमदारांना अशोक गेहलोत यांचा पाठिंबा असल्याचं मल्लिकार्जून खर्गे यांचं म्हणणं असल्याचं वृत्त इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.
अजय माकन संतापले
दरम्यान, आमदारांशी चर्चा करण्यासाठी पोहोचलेले काँग्रेसचे निरीक्षक अजय माकन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले “प्राथमिकदृष्ट्या ही अनुशासनहीनता सुरु आहे. आम्ही बैठक बोलावलेली असताना त्याच वेळी आणखी एक बैठक बोलावण्यात आली. ते सर्व आमदार आहेत. कोणी राजीनामा दिला आहे हे त्यांनाच माहिती नाही. काँग्रेस अध्यक्ष यावर निर्णय घेतील. त्यांनी काही मागण्या ठेवल्या असून आम्ही त्या मान्य करणार नाही. आम्ही आमदारांची वाट पाहिली, पण ते आले नाहीत. आता आम्ही आमचा अहवाल नेतृत्वाकडे सादर करु”.