दिल्लीला आंध्राने रोखले : सबज्युनियर राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन मान्यता प्राप्त कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना व बीडीएफए यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य को. ऑप. सोसायटी पुरस्कृत राष्ट्रीय 14 वर्षाखालील उपकनिष्ठ फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन दिवशी राजस्थानने तेलंगणाचा तर ओडीसाने चंडीगडचा पराभव करून विजयी सलामी दिली. दिल्लीला आंध्रप्रदेशने 1-1 अशा बरोबरीत रोखले. माळमारूती येथील लव्हडेल स्कूल येथील स्पोर्टींग प्लॅनेट टर्फ फुटबॉल मैदानावर आयोजित केलेल्या सबज्युनियर फुटबॉल स्पर्धेत सकाळी उद्घाटन सामना राजस्थान वि. तेलंगणा यांच्यात सकाळी 8. 30 वाजता सुरू झाला. या समान्यात पहिल्या मिनिटापासून राजस्थानने आक्रमक चढाया सुरू केल्या. 26 व्या मिनिटाला मंजू खनकरच्या पासवर आलिया खानने गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 28 व्या मिनिटाला तेलंगणाच्या गोदी पाटीने गोल करून 1-1 बरोबरी साधली मात्र राजस्थानने आक्रमक चढाई करत 39, 42, 48 व 62 व्या मिनिटाला मंजु कनकरने सलग 4 गोल करून 5-1 अशी आघाडी मिळविली. या सामन्यात तेलंगणाने अनेक गोल करण्याच्या संधी वाया दवडल्या.
दुसऱ्या सामन्यात ओडीसाने चंडीगडचा 8-0 असा पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात ओडीसाने चंडीगडवर 4-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात पुन्हा आक्रमक चढाया करीत 4 गोल करत 8-0 अशी मोठी आघाडी मिळविली. या सामन्यात चंडीगडला गोल करण्यात अपयश आले. तिसऱ्या सामन्यात दिल्ली व आंध्रप्रदेश यांच्यात कडवी लढत झाली. 11 व्या मिनिटाला दिल्लीच्या धवानी विदादरने गोल करण्याची नामी संधी दवडली. 20 व्या मिनिटाला दिल्लीची सुषमाने मारलेला फटका आंध्राच्या गोलरक्षकाने उत्कृष्ट अडविला. 32 व्या मिनिटाला सुषमाच्या पासवर विदादरने गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघानी गोल करण्याचा अनेक प्रयत्न केला पण यश आले नाही. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघानी गोल करण्यासाठी आक्रमक चढाया केल्या. या सत्रात जादा वेळेमध्ये आंध्राच्या अक्कम्मा गरीवर्षीने गोल करून 1-1 अशी बरोबरी साधली. दिल्लीच्या विजयाला विरजन घातले. शेवटी हा सामना 1-1 अशा बरोबरीत रोखले. सकाळी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी दिल्लीहून आलेल्या सामनाधिकारी नेहा चौहान, बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब, पेट्रॉन, राम हदगल, अमित पाटील, एस. एस. नरगोडी, लेस्टर डिसोझा, व्हिक्टर परेरा, उमेश मजुकर, गोपाळ खांडे, मतिन इनामदार आदी उपस्थित होते.
शनिवारचे सामने : 1) मध्यप्रदेश वि. जम्मू-काश्मिर दु. 3 वा. 2) केरळ वि. उत्तर प्रदेश दु. 5.30 वा.









