वृत्तसंस्था/ मुल्लानपूर
गुजरात टायटन्सविरुद्धच्या चुरशीच्या सामन्यातील पराभवाने निराश झालेल्या राजस्थान रॉयल्सला आज शनिवारी येथे पंजाब किंग्जचा सामना करताना रणनीती चांगल्या प्रकारे अमलात आणण्यावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. रॉयल्सला मागील सामन्यात पाचव्या विजयाची नोंद करण्याची आणि आपले अग्रस्थान मजबूत करण्याची उत्कृष्ट संधी होती. परंतु रशिद खानच्या धाडसी हल्ल्यामुळे बुधवारी गुजरात टायटन्सला शेवटच्या चेंडूवर विजय मिळवण्यास मदत झाली.
सदर पराभवाने रॉयल्सच्या रणनीतीतील गोंधळावरही प्रकाश टाकला आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघाला कुलदीप सेन (19 वे षटक) आणि आवेश खान (20 वे षटक) यांनी 12 चेंडूंमध्ये 35 धावा दिल्याने टायटन्सकडून पराभव पत्करावा लागला. त्याचवेळी 2 षटकांत 8 धावा दिलेल्या अनुभवी डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला त्याचा कोटा पूर्ण न करू देऊन संघाने रणनीतीच्या बाबतीत थोडी चूक केली. बोल्टने स्थिती पालटून टाकली असती असे म्हणता येणार नसले, तरी कर्णधार सॅमसनने तो पर्याय न वापरता सोडणे थोडे गोंधळात टाकणारे होते.
शिखर धवनच्या नेतृत्वाखालील संघाने स्पर्धेत आतापर्यंत पाचपैकी दोन सामने जिंकले आहेत आणि तीन ते पराभूत झाले आहेत. यावर्षी प्रमुख फलंदाजांचा खराब फॉर्म त्यांना नडला आहे. पंजाब आता फलंदाजीच्या बाबतीत उदयोन्मुख शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांच्यावर अवलंबून आहे. सलामीवीर जॉनी बेअरस्टो (5 सामन्यांत 81 धावा) आणि मधल्या फळीतील फलंदाज जितेश शर्मा (5 सामन्यांत 77 धावा) यांनी सर्वांत जास्त निराशा केली आहे. त्यामुळे त्यांच्या डावाच्या सुऊवातीस आणि शेवटी वेग खुंटू लागला आहे.
सॅम करनने पाच सामन्यांतून सहा बळी घेतलेले असले, तरी इंग्लंडच्या या अष्टपैलू खेळाडूला 63 धावा काढूनही फलंदाजीत फारशी चमक दाखविता आलेली नाही. मधल्या फळीतील जखमी लियाम लिव्हिंगस्टोनच्या अनुपस्थितीमुळे देखील त्यांची ताकद कमी झाली आहे आणि किंग्जला सदर इंग्लिश खेळाडू कधी परत येतो याची प्रतीक्षा लागून राहिलेली असेल. याउलट पंजाबच्या गोलंदाजांनी तुलनेने चांगली कामगिरी केली आहे, परंतु प्रथम गोलंदाजी करताना त्यांनी भरपूर धावा दिलेल्या असून ते चिंताजनक आहे.
कागिसो रबाडा व अर्शदीप सिंगसारख्यांचा समावेश असलेल्या पंजाब किंग्जच्या गोलंदाजी विभागाने त्यांच्या मागील तीन सामन्यांमध्ये 199, 199 आणि 182 अशा धावा दिल्या आहेत आणि त्यांना रॉयल्सविऊद्ध यात बदल करावा लागेल. मात्र हे सोपे जाणार नाही. कारण रॉयल्सची फलंदाजी ही भक्कम असून त्यांनी प्रथम फलंदाजी करताना नोंदविलेली सर्वांत कमी धावसंख्या ही 185 आहे.
संघ : पंजाब किंग्ज-शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, सॅम करन, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, हरप्रीत भाटिया, विद्वथ कवेरप्पा, शिवम सिंग, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंह, शशांक सिंग, तनय त्यागराजन, प्रिन्स चौधरी, रिली रोसाव.
राजस्थान रॉयल्स-संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोवन फरेरा, कुणाल राठोड, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, आवेश खान, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, टॉम कोहलर-कॅडमोर, अबिद मुश्ताक, नांद्रे बर्गर, तनुष कोटियन, केशव महाराज.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.









