जयपूर / वृत्तसंस्था
राजस्थानातील अशोक गेहलोत यांच्या मंत्रिमंडळातील एक कॅबिनेट मंत्री विश्वेंद्र सिंग यांचे पुत्र अनिरुद्ध सिंग यांनी राहुल गांधींवर कठोर शब्दांमध्ये दुगाण्या झाडल्या असून त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधी हे अविवेकी आहेत, असा ट्विटर संदेश त्यांनी प्रसारित केल्याने राजस्थान काँगेसमध्ये नवीनच संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सिंग हे अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय मानले जातात,. त्यामुळे या ट्विटला वेगळाच रंग प्राप्त झाला आहे.
राहुल गांधी दुसऱया देशाच्या संसदेत जाऊन भारताचा अपमान करतात. कदाचित ते इटलीला आपली मातृभूमी मानतात. ते अविवेकी आणि अविचारी विधाने करतात अशा अर्थाचा मजकूर त्यांनी ट्विटमध्ये पुढे लिहिला आहे. या ट्विटला असंख्य लाईक्स मिळाले असून अनेकांनी त्यांच्या टिप्पण्याही पोस्ट केल्या आहेत. इटलीचे माफिया भारतात जमीन हडप करता आहेत, असे ट्विटही अनिरुद्ध सिंग यांनी एका पोस्टच्या उत्तरादाखल केले आहे. अनिरुद्ध सिंग यांचे मंत्री असलेले पिता गेहलोत यांचे समर्थक असले तरी ते स्वतः सचिन पायलट यांचे कट्टर पाठीराखे असून पितपुत्रांमध्ये हा राजकीय वाद बऱयाच काळापासून सुरा असल्याचे बोलले जाते. अनिरुद्ध सिंग हे आपल्या पित्यापासून दूर आपल्या मातेबरोबर राहतात. त्यांनी आपल्या पित्यावरही ते व्यसनी आणि दुर्व्यवहारी असल्याचा आरोप केला होता. ते आपल्या आईला अतियश वाईट वागणूक देतात असेही विधान त्यांनी काही वर्षांपूर्वी केले होते. तथापि, आता त्यांनी थेट sराहुल गांधींवरच हल्लाबोल केल्याने त्याचे पडसाद तीव्रतेने उमटत आहेत.









