शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांचा हल्ला
वृत्तसंस्था/ बारामुल्ला
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत राजस्थानमधील चुरू येथील एक जवान हुतात्मा झाला. शनिवारी मध्यरात्री 12.15 च्या सुमारास 14 राष्ट्रीय रायफल्स आणि गढवाल रायफल्सची संयुक्त शोधमोहीम सुरू होती. यादरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यामुळे योगेश जाट (28) नामक जवान हुतात्मा झाला. योगेशचे पार्थिव सोमवारी त्याच्या मूळ गावी सादुलपूर लांबोर येथे पोहोचल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
योगेश जाट हा भारतीय लष्कराच्या 14 राष्ट्रीय रायफल्समध्ये कॉन्स्टेबल म्हणून प्रतिनियुक्तीवर होता. तो 2013 मध्ये क्रीडा कोट्यातून सैन्यात भरती झाला होता. त्यांचे संपूर्ण कुटुंब बिकानेर येथे राहते. योगेशची पत्नी सुदेश (23) ही बिकानेर येथील पीबीएम रूग्णालयात नर्सिंग कर्मचारी आहे. त्यांना हार्दिक हा 4 वर्षांचा मुलगा आणि निशा नामक 4 महिन्यांची मुलगी आहे. योगेशचे वडील पृथ्वीसिंह हे शेतकरी असून आई विमलादेवी गृहिणी आहे. त्यांचे मूळ घर सादुलपूर तालुक्यातील लांबोर येथे आहे.









