वृत्तसंस्था / जयपूर
राजस्थानात शुक्रवारी गॅस टँकर अपघातातील मृतांची संख्या आता 14 झाली आहे. टँकरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो अनेक वाहनांवर आदळून शेवटी घातक रसायनांनी भरलेल्या एका ट्रकवर आदळला होता. त्यानंतर तो पलटला होता. त्यामुळे प्रचंड स्फोट होऊन भीषण आग लागली होती. या आगीत होरपळून शुक्रवारी 14 लोक प्राणास मुकले होते. तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते. शनिवारी आणखी तीन जखमींचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना भानक्रोटा-जयपूर महामार्गावर घडली होती. शनिवारी काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या अपघाताची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला असून त्यानंतर दुर्घटनेच्या कारणांचा पत्ता लागणार आहे.









