आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या 33 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने पहिल्या यादीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना सरदारपुरामधून, तर माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना टोंकमधून उमेदवारी दिली आहे. याच यादीत सचिन पायलट यांच्या गटातील चार उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर जवळपास दोन आठवड्यांनंतर, काँग्रेसने आजअखेर राजस्थानसाठी आपली पहिली यादी जाहीर केली. राज्यातील 200 विधानसभेच्या जागांपैकी 33 जागांसाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
राज्यतील संघटनेत दरी पडल्याने काँग्रेसच्या उमेदवारांबाबतच्या जागांची चर्चा रखडली होती. या पहिल्या यादीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत, तसेच त्यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी आणि प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतसरा यांचा समावेश आहे.
काँग्रेसने जाहीर केलेल्या 33 नावांपैकी 29 विद्यमान उमेदवार हे विद्यमान आमदार आहेत. उरलेल्या चार उमेदवारांनी 2018 मध्ये आपापल्या जागांवरून निवडणूक लढवली होती. पण त्यावेळी त्यांचा भाजपच्या उमेदवारांकडून पराभव झाला होता.
या पहिल्या यादीत अनेक उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या इंद्रराज गुर्जर, मुकेश भाकर आणि रामनिवास गवरिया निष्ठावंतांचा समावेश आहे. याशिवाय राखीव अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागांवरील चार उमेदवारांचाही समावेश आहे.









