ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सेक्सटॉर्शनच्या त्रासाला कंटाळून मागील महिन्यात पुण्यातील दोन तरुणांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणाच्या तपासात पुणे पोलिसांना मोठं यश आलं आहे. पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शुभम वाडकर या विद्यार्थ्याने सेक्सटॉर्शनला बळी पडून आत्महत्या केली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पुणे पोलिसांनी राजस्थानातून अटक केली आहे. आरोपीने हजारो नागरिकांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील गुरूगोठडी हे संपूर्ण गाव देशभरात हे रॅकेट चालवत असल्याची माहिती तपास अधिकारी अक्षय सरोदे यांनी दिली.
अन्वर सुबान खान (वय 29, रा. गुरुगोठडी ता.लक्ष्मनगढ जि. अलवर, राजस्थान) असे या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव आहे. दत्तवाडी पोलीस स्टेशन सायबर गुन्हे तपास पथकाने तांत्रिक विश्लेषन करून व लोकेशनव्दारे त्याला ताब्यात घेतले. पुण्यात सेक्शटॉर्शनचे बळी गेल्यानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी केवळ स्थानिक तपास यंत्रणाच नाही तर केंद्रीय तपास यंत्रणांच्या समोर ही मोठं आव्हान होतं. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी जंग जंग पछाडलं आणि अखेर राजस्थान गाठलं.
वेशांतर करुन आरोपीला ठोकल्या बेडय़ा
राजस्थानमधून गुरुगोठडी गावातून सेक्सटॉर्शनचे रॅकेट देशभर चालविले जात असल्याची माहिती पोलिसांना होती. त्यानुसार दत्तवाडी पोलीस तांत्रिक बाबींद्वारे आरोपीचा माग काढत राजस्थानात पोहचले. डोक्यावर पगडी, गमछा असा तेथील पोशाख परिधान करुन पोलिसांनी गुरुगोठडी गावात प्रवेश केला. आरोपीची माहिती काढली आणि त्याला अटक केली. यावेळी आरोपीला त्याच्या घराकडून घेवून जात असताना आरोपीच्या नातेवाईकांनी व गावातील लोकांनी पोलिसांना विरोध केला. पोलिसांवर दगडफेक करुन आरोपीस पळवून लावले. त्यावेळी पोलिसांनी आरोपीचा 2.5 कि.मी पाठलाग करुन जीवाची पर्व न करता त्याला ताब्यात घेतलं. जमतारा वेबसिरीजला लाजवेल अशा पद्धतीने राजस्थान मधल्या ग्रामीण भागात हे सिंडीकेट चालवले जातात.
560 घरांचं गाव, प्रत्येक घरात सायबर चोरटा
राजस्थानच्या अलवार जिल्ह्यातील गुरूगोठडी हे गाव. या गावात एकूण 560 घरं. प्रत्येक घरात ऑनलाईन गंडा घालणारा एक सायबर चोरटा. देशातले अनेक नावाजलेले उद्योजक, न्यायाधीश, वकील यांना या गावाने सेक्सटॉर्शनच्या नावाखाली गंडा घातला आहे. पुण्यात घडलेल्या दोन आत्महत्यांचं कारण हेच गाव असल्याचे आता उजेडात आलं आहे. देशभरात असे हजारो गुन्हे केलेल्या या गावात मातीच्या घरात एसी, मोठय़ा चारचाकी गाडय़ा दिसतात. गावाबाहेर बसलेली तरूणींची टोळी गावात कुणी नवीन आलं की, सगळय़ा गावाला अलर्ट करते. आजूबाजूच्या गावातल्या मुलांना सायबर क्राईम करण्याचे ट्रेनिंग देण्याचे कोर्सेस ही या गावात चालवले जातात.








