कार्यकारी मंडळाची फेरनिवड
कुडाळ –
बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या ( बिबवणे ) अध्यक्षपदी राजाराम सावंत यांच्यासह कार्यकारी मंडळाची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. लक्ष्मीनारायण विद्यालयाच्या नूतन सुसज्ज इमारतीसाठी निधी संकलन करून अल्पावधीत बहुतांशी बांधकाम पूर्ण करण्यात यशस्वी ठरल्याबद्दल अध्यक्ष श्री सावंत यांच्यासह कार्यकारी मंडळाचे सभागृहात कौतुक करण्यात आले. बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची वार्षिक सभा आयोजित करण्यात आली होती. विद्यालयाची एक सुसज्ज व प्रशस्त इमारत असावी, असे संस्थाध्यक्ष राजाराम सावंत यांचे स्वप्न होते. या इमारतीसाठी अंदाजपत्रकीय रक्कम पावणेदोन कोटी एवढी आहे. मात्र, मोठे धाडस करून या कार्यकारी मंडळाने पायाभरणी करून इमारत कामाला सुरुवात केली.श्री सावंत यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकारी मंडळाने निधी संकलनासाठी जोमाने काम केले. माजी विद्यार्थ्यांसह अन्य क्षेत्रातील दात्यानीही हातभार लावला. मुंबईतील माजी विद्यार्थ्यांचे मोठे सहकार्य मिळाले. निधी संकलनात अध्यक्ष श्री सावंत यांची चिकाटी व पुढाकार महत्वाचा राहिला.शालेय प्रगतीच्या दृष्टीनेही या कार्यकारी मंडळाने काही सुविधा उपलब्ध करून दिल्या.या सर्व गोष्टींचा विचार करून विद्यमान कार्यकारी मंडळाला तीन वर्षाचा कालावधी वाढवून देत सन 2025 ते 2028 साठी अध्यक्षांसह अन्य पदाधिकारी व संचालक यांची फेर निवड करण्यात आली. यात अध्यक्ष राजाराम सावंत, उपाध्यक्ष- आनंद गावडे, खजिनदार- भरत सामंत, सचिव- प्रकाश कुबल, सहसचिव विठ्ठल माळकर संचालक – रमाकांत चव्हाण, वामन सावंत, दिलीप ओरोसकर,निखिल ओरोसकर, वामन राऊळ यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली, तर रिक्त झालेल्या एका संचालकपदासाठी मुंबईस्थित विनय लूडबे ( बिबवणे ) यांची एकमताने निवड करण्यात आली. अंतर्गत हिशेब तपासणीस म्हणून गिरीश राऊळ व विष्णू शिरोडकर, शैक्षणिक सल्लागार म्हणून मधुकर कुबल व सूर्यकांत बिबवणेकर यांची, तर कायदे विषयक सल्लागार म्हणून अँड अमोल सामंत यांची एकमताने निवड करण्यात आली. संस्थेच्या या कार्यकारी मंडळानेच नूतन इमारत सन 2028 पूर्वी पूर्णत्वास न्यावी, अशी अपेक्षा उपस्थित सभासदांनी व्यक्त केली. इंग्लिश मीडियम स्कूल सुरू करणे आणि प्रशालेतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देण्याच्यादृष्टीने चर्चा करण्यात आली. मुक्तांगण सपाटीकरण करणे व संरक्षक भिंत बांधण्याबाबत तसेच प्रशालेच्या इमारतीसाठी अजून निधीची आवश्यकता असल्याने निधी संकलना बाबतही चर्चा करण्यात आली.अध्यक्ष श्री सावंत म्हणाले, प्रशालेला शैक्षणिक व भौतिक सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहीला आहे. सर्वांच्या सहकार्याने नूतन इमारतीचे बाधकाम झपाट्याने सुरु आहे. कार्यकारी मंडळाने बऱ्यापैकी पाठबळ दिले.काही वेळा आर्थिक अडचण निर्माण झाली. परंतू काम थांबले नाही.आता जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. मुबंईस्थित माजी विद्यार्थ्यांचे महत्वाचे योगदान आहे. उर्वरित 20 टक्के कामासाठी निधीची आवश्यकता असून माजी विद्यार्थ्यांसह संस्थेच्या सभासदांनीही सहकार्य करून नूतन वास्तूच्या स्वप्नपूर्तीसाठी हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले. संस्थेचे माजी अध्यक्ष राजाराम ओरोसकर, माजी उपाध्यक्ष दयानंद सामंत, माजी सचिव शरद नाईक, माजी संचालक यशवंत चव्हाण अविनाश लोके व पद्माकर वालावलकर, दत्ताराम कुबल, कृष्णा बिबवणेकर, नारायण राऊळ, गोविंद वेंगुर्लेकर, शामसुंदर लोके,अमित वालावलकर , वासुदेव धुरी, प्रदीप ओरोसकर, अरुण चव्हाण, आनंद मार्गी, राजन माजरेकर, सिद्धेश सामंत, सीताराम नाईक यांच्यासह अन्य सभासद उपस्थित होते.









