श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखानाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराच्या धुळा थांबल्या नंतर आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे यासाठी निवडणूक अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने जोरदार तयारी केली असून जिल्ह्यात एकूण 58 केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मतदान केंद्र परिसरात 144 कलम लावण्यात आले असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रचाराची सांगता एकमेकांवर जोरदार टीका:
कोल्हापुरात श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू असून गेल्या 15 ते 20 दिवसांपासून सतेज पाटील आणि महाडिक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होत्या. दोन्ही गटांकडून जोरदार प्रचार आणि सभा घेत वैयक्तिक पातळीवर जात टीका करण्यात आली. तर सभासदांना आश्वासनाचे गाजर ही दाखवण्यात आले.सभासद अपात्र आणि त्यांनतर ऐन डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी दोन्ही गटाकडून बिंदू चौकात येण्याचे आव्हान देत गोंधळ निर्माण करण्यात आला. या सर्वानंतर अखेर शुक्रवारी (दि 21) प्रचाराची धुरा शांत झाली आणि आज प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोपांमुळे निवडणुकीत चांगलीच रंगत आली असल्याने माजी आमदार महादेराव महाडिक व आमदार सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहेत.
आज मतदान :
प्रचाराच्या धुरा शांत झाल्यानंतर आज मतदान प्रक्रिया पार पडत असून या पार्श्वभूमीवर निवडणूक कार्यालय आणि पोलीस प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.हातकणंगले, करवीर, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा या तालुक्यांतील एकूण 58 मतदान केंद्रांवर सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान पार पडणार आहे.त्यासाठी 580 कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या असून एका केंद्रावर दहा कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत तसेच पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे.तसेच मतदान निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडणे आवश्यक असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता मतदान केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1976 चे कलम 144 नुसार बंदी आदेश जारी करण्यात आले आहेत.
मतदान साहित्य कर्मचारी रवाना:
सकाळी आठ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याने निवडणूक कार्यालयाकडून काल सकाळपासून रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल येथून कर्मचाऱ्यांसह साहित्य वाटप करत मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आले होते. तर मंगळवार 25 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजल्यापासून रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल येथे मतमोजणी सुरुवात होणार आहे. ही निवडणूक एकूण 21 जागांसाठी होत असून उत्पादक सभासद हे 13407 आहेत तर संस्था सभासद हे 129 इतके असून सभासद आपलं मत कोणाला देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.