कोणाचा कंडका मोडणार आणि कोणाची सत्ता येणार हे थोड्याच वेळात समजणार
कोल्हापूर: गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेली आणि गेल्या पंधरा ते 20 दिवसात कोल्हापूरचा राजकारण तापवणारी श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. यामुळे कोल्हापूर सह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष या निकालाकडे लागले असून आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आज दुपारपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होणार असून यंदा 91.12% चुरशीने व अटीतटीने मतदान पार पडले असून गेल्या निवडणुकीपेक्षा एक टक्क्याने मतदान वाढले असून मतदार राजा कोणाला सत्तेत आणणार आणि कोणाचा कंडका मोडणार हे आज स्पष्ट होणार आहे.
दोन अपक्षांसह एकूण 44 उमेदवार रिंगणात:
बहुचर्चित अशा श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी ही अंतिम टप्प्यात आली असून रविवारी चुरशीने व अटीतटीने पार पडलेल्या मतदानानंतर आज आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होत असून कसबा बावड्यातील रमणमळा परिसरातील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात दोन फेरीमध्ये 29 टेबलवर मतमोजणी होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पहिले 29 आणि दुसऱ्या टप्प्यतात पुढील 30 ते 58 या केंद्रांची मतमोजणी होणार आहे. राजाराम साखर कारखान्याच्या संस्था गटातील एक व अन्य गटातील 20 अशा 21 जागांसाठी निवडणूक होत असुन यासाठी दोन अपक्षांसह एकूण 44 उमेदवार रिंगणात आहेत. तर दुपारपर्यंत निकालाचे कल हातात येण्याची शक्यता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तसेच दोन्ही गटातील सभासद आणि उमेदवारांना वेगवेगळी जागा नेमून देण्यात आली असून परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहेत.
दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला:
जिल्ह्यात माजी आमदार महादेवराव महाडिक विरुद्ध आमदार सतेज पाटील यांच्यातील संघर्ष नेहमीच चर्चेत आहे. लोकसभा,विधानसभा, विधानपरिषद आणि गोकुळ दूध संघात सतेज पाटील यांनी महाडिकांना शह देत हातातून काढून घेतले. तर आता गेल्या 30 वर्षापासून राजाराम सहकारी साखर कारखान्यावर वर्चस्व असलेल्या महादेवराव महाडिक यांच्या हातातून कारखाना काढून घेण्यासाठी सतेज पाटील यांनी चांगलीच ताकद लावली होती तर कोणत्याही परिस्थितीत कारखाना हातातून सोडायचा नाही म्हणत महाडिक परिवार ही मैदानात उतरल होत. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून सतेज पाटील आणि महाडिक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होत्या.सभासद अपात्र आणि त्यांनतर ऐन डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी दोन्ही गटाकडून बिंदू चौकात येण्याचे आव्हान देत गोंधळ निर्माण करण्यात आला.यामुळे हि लढत अधिक रंगतदार झाली होती. यामुळे मतदार राजाने देखील उत्स्फूर्तपणे सहभागी होत 91.12% अशा चुरशीने मतदान केले आहे. यामुळे दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून दोन्ही पॅनल मधील उमेदवारांची धुगधुग वाढली असून मतदार राजाने आपलं बहुमूल्य मत हे कोणाला दिले आहे हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
दोघांकडून मतदारराजाला “गाजर” दाखवण्याचा प्रयत्न मात्र मतदारराजा जागरुक :
राजाराम कारखान्याची सत्ता ही महाडिक गटाकडे राहिलेली जिल्हा पातळीवरील एकमेव सत्ता आहे जिल्ह्याच्या राजकारणात महाडीक गट बॅकफुटवर गेला आहे.तर ही सत्ता उलटून लावण्यासाठी सतेज पाटील यांनी चांगलीच कंबर कसली होती. निवडणूक कोणतेही असो, ती सतेज पाटील यांनी एकदा अंगावर घेतली की मग मागेपुढे पाहायचे नाही. तिला भिडायचे असं त्यांच असल्याने तशीच यंत्रणा त्यांनी या निवडणुकीत राबवली. या निवडणुकीत दोन्ही गटा कडून यंत्रणा राबवण्यापासून रोजची जेवणावळी व प्रत्यक्ष रोख रक्कम वाटप झाल्याचे व्हिडिओ समोर आले असून अगोदर एका गटाने पाच हजार दिले, ते दुसऱ्या गटाला समजल्यावर त्यांनी दहा दिले. मग पहिल्या गटाने आणखी दहा हजार मताला दिले असे अनेक गावांत घडले. मतदारांनी दोघांकडून पैसे घेतले मात्र मतदार हा जागरूकपणे मतदान केला असून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.