पक्षविरोधी वक्तव्य भोवले : ‘मतचोरी’च्या मुद्द्यावरून स्वपक्षावरच केली होती टीका
बेंगळूर : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप केला आहे. या बाबतीत काँग्रेसमधील नेत्यांनी एकजूट दाखविलेली असताना सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांनी पक्षविरोधी वक्तव्य केले आहे. या पार्श्वभूमीवर राजण्णा यांची सोमवारी मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी बेंगळुरात सभाही घेतली होती. मात्र, मंत्री के. एन. राजण्णा यांनी मतदार यादी काँग्रेस सरकारच्या काळातच झाली होती. महादेवपूर मतदारसंघात मतचोरी होण्यास आमची चूकच कारणीभूत होती.
मतदारयादीत फेरफार होत असताना तत्कालिन राज्य सरकार झोपेत होते का?, असे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य राजण्णा यांच्या अंगलट आले आहे. या वक्तव्याची काँग्रेस हायकमांडने गांभीर्याने दखल घेत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. हकालपट्टीचा पेच टाळण्यासाठी राजण्णा यांनी आपले पुत्र विधानपरिषद सदस्य राजेंद्र राजण्णा यांच्यामार्फत सोमवारी दुपारी राजीनामापत्र मुख्यमंत्र्यांकडे सोपविले. मात्र, त्यांचा राजीनामा न स्वीकारता थेट बडतर्फ करण्याची शिफारस राज्यपालांकडे केली. या संदर्भात राज्य सरकारच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनी राज्यपालांचे विशेष सचिव आर. प्रभूशंकर यांना पत्र पाठविले. मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनुसार राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी राजण्णा यांना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करण्याच्या अधिसूचनेवर स्वाक्षरी केली आहे.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच कारवाई
सोमवारपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ झाला आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी के. एन. राजण्णा यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांचे मौन
के. एन. राजण्णा हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निकटवर्तीय गटातील आहेत. राजण्णा यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आल्यानंतर सिद्धरामय्या यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विधानसभेत किंवा विधानसभेतून बाहेर पडताना त्यांनी पत्रकारांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. हायकमांडच्या चर्चेनंतर ते प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे.
हकालपट्टीमागे फितुरी!
माझी मंत्रिमंडळातून हकालपट्टी होण्यामागे फितुरी आणि षड्यंत्र आहे. काय घडले, यामागे कोण आहे, हे ठाऊक आहे. वेळ येताच मी ते उघड करेन. सिद्धरामय्या यांनी मला मंत्री होण्याची संधी दिली. त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. राहुल गांधी आणि के. सी. वेणूगोपाल यांना माझ्याबद्दल चुकीची समजूत झाली आहे.
– के. एन. राजण्णा, माजी मंत्री









